यंदा हरितालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी!
गणेशस्थापनेसाठी दुपारी १.४५ वाजेपर्यंत मुहूर्त, सकाळी ११.१५ ते दुपारी १.४५ विशेष पूजनाचा काळ


यंदा हरितालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी!
गणेशस्थापनेसाठी दुपारी १.४५ वाजेपर्यंत मुहूर्त, सकाळी ११.१५ ते दुपारी १.४५ विशेष पूजनाचा काळ
जळगाव | प्रतिनिधी यंदा हरितालिका व्रत आणि श्रीसिद्धिविनायक गणेश चतुर्थी एकाच दिवशी, सोमवार, १४ सप्टेंबर रोजी येत आहेत. पंचांगानुसार १४ सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल तृतीया सकाळी ८.२१ वाजता समाप्त होऊन चतुर्थी सुरू होत आहे. ही चतुर्थी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०५ वाजता समाप्त होत असल्याने धर्मशास्त्रीय निर्णयानुसार दोन्ही व्रते १४ सप्टेंबरलाच करण्याचे निश्चित झाले आहे.
हरितालिकेसाठी सकाळचा काळ प्रशस्त
माधवाचार्यांच्या निर्णयानुसार, उत्तरदिवशी तृतीया मुहूर्तमात्र असली तरी चतुर्थीच्या संयोगामुळे तो दिवस गौरीव्रतासाठी ग्राह्य ठरतो. त्यामुळे १४ सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी प्राप्त होणारी तृतीया हरितालिकेसाठी प्रशस्त मानली जाते. हरितालिका पूजेला प्रातःकालाचे विशेष महत्त्व असल्याने शक्यतो सकाळीच पूजन करणे उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.
तिथी संपली म्हणजे पूजाधिकार संपत नाही
धर्मशास्त्रीयदृष्ट्या औदयिक किंवा नियत कर्मकाळातील तिथिसंबंध त्या दिवसाला व्रताची ग्राह्यता देतो. मात्र, तिथी संपताच पूजेचा अधिकारही संपतो, असा नियम नाही. त्यामुळे तृतीया सकाळी ८.२१ वाजता संपत असल्याने हरितालिकेचे सर्व पूजोपचार त्यापूर्वीच पूर्ण करणे आवश्यक आहे, असा अर्थ होत नाही. मात्र, हरितालिका पूजेसाठी सकाळचा काळ अधिक प्रशस्त मानला जातो.
गणेश पूजेसाठी मध्याह्नकाळ महत्त्वाचा
श्रीगणेश चतुर्थीच्या व्रतामध्ये मध्याह्नव्याप्तीला विशेष महत्त्व आहे. धर्मशास्त्रात तृतीयाविद्धा चतुर्थी प्रशस्त मानली असून, गणपतिकल्पातही मध्याह्नकाळी गणेशपूजेचा निर्देश आढळतो. यंदा १४ सप्टेंबर रोजी चतुर्थी मध्याह्नकाळ व्यापत असल्याने गणेशोत्सवासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला आहे.
दुपारी १.४५ वाजेपर्यंत गणेशस्थापना
१४ सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून दुपारी १.४५ वाजेपर्यंत श्रीगणेशाची स्थापना व प्राणप्रतिष्ठा करता येईल. गणेश चतुर्थीचे विशेष पूजन सकाळी ११.१५ ते दुपारी १.४५ या मध्याह्नकाळात करणे विशेष प्रशस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन्ही व्रतांसाठी स्वतंत्र कर्मकाळ
हरितालिका आणि सिद्धिविनायक ही दोन स्वतंत्र व्रते आहेत. त्यामुळे हरितालिकेची पूजा पूर्ण झाल्याशिवाय गणेशाची प्राणप्रतिष्ठा करता येणार नाही किंवा गणेशपूजन झाल्यानंतर हरितालिका करता येणार नाही, असा कोणताही अनिवार्य पूर्वापर विधी नाही. हरितालिकेसाठी प्रातःकाल, तर गणेशाच्या प्रधान पूजेसाठी मध्याह्नकाळ हा आपापला प्रशस्त कर्मकाल आहे.
१५ सप्टेंबरला पारणा
हरितालिकेचा उपवास १४ सप्टेंबर रोजी करावा. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी उत्तरपूजा व विसर्जन केल्यानंतर पारणा करावा, असे धर्मशास्त्रीय निर्णयानुसार सांगण्यात आले आहे.







