कामगाराची ईमानदारी : रस्त्यावर सापडलेला आयफोन केला परत!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । माणुसकी आणि प्रामाणिकपणा हरवलेल्या जगात आज देखील ईमानदारी शाबूत असल्याचे काही उदाहरणे अधूनमधून समोर येत असतात. एकीकडे बुधवारी झालेल्या रेल्वे अपघातात मयताचे दागिने आणि रोकड चोरल्याचे समोर आले होते तर दुसरीकडे ५०० रुपये रोजंदारीने कामाला जाणाऱ्या कामगाराने रस्त्यावर सापडलेला आयफोन विद्यार्थ्याला परत दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अयोध्या नगरात राहणारा मयूर पाटील हा विद्यार्थी टॉवर चौक परिसरात नातेवाईकांसह आलेला होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याचा आयफोन कुठेतरी पडला. एमआयडीसी परिसरातील केमीकल कंपनीत काम करणारे देविदास सपकाळे वय-६० रा.कानळदा यांना तो मोबाईल सापडला.
शहर पोलिसांनी परत केला मोबाईल
देविदास सपकाळे यांनी मोबाईल सापडताच लागलीच शहर पोलीस ठाणे गाठले. शहर पोलिसांनी त्याची विचारपूस केली आणि संबंधित मोबाईलवर येणारा कॉल स्वीकारला. विद्यार्थ्याला पोलीस ठाण्यात बोलावून सपकाळे यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आला.
पोलीस निरीक्षकांनी दिले बक्षीस
मोबाईल प्रामाणिकपणे परत देणाऱ्या देविदास सपकाळे यांना विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी २०० रुपये भेट दिले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांनी प्रामाणिकपणा ओळखून १ हजार रुपये रोख बक्षीस दिले आणि त्याच्या कार्याचे कौतुक केले.