मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील तिघांवर एकाच दिवशी ‘एमपीडीए’

महा पोलीस न्यूज | दि.२७ ऑगस्ट २०२४ | जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एमपीडीए कारवायांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी कारवायांचा वेग वाढवला असून २८ पेक्षा अधिक एमपीडीए कारवाई करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मंगळवारी एकाच दिवशी तीन गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जळगाव जिल्हयांतील एमआयडीसी पोलीस स्टेशन, यावल पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील ३ गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात आहे. तिघे गुन्हेगार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक-५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत मोडणारे आहेत.
संपूर्ण कारवाई करण्याकामी प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांचे अधिनस्त हवालदार सुनिल पंडीत दामोदरे, हवालदार जयंत चौधरी, रफिक शेख कालु, संदिप चव्हाण, ईश्वर पाटील अशांनी काम पाहिले आहे.
एमआयडीसी हद्दीतील खंड्याची नागपूर कारागृहात रवानगी
एमआयडीसी पो.स्टे. हद्दीतील आकाश ऊर्फ खंडया सुकलाल ठाकुर वय-२४ रा.नितीन लॉड्रीच्या मागे तुकारामवाडी, जळगाव ता.जि.जळगाव याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत ७ गुन्हे दाखल आहेत. त्याचा एमपीडीए प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तयार करुन प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.१९ ऑगस्ट रोजी सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेकडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांनी नागपूर कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि.जगदाळे, पोहेकॉ.दत्तात्रय बडगुजर, पोकॉ.योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे अशांनी स्थानबध्द इसमास ताब्यात घेतले आहे. स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, नागपूर जि.नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
यावलच्या गुन्हेगारावर दाखल आहेत १० गुन्हे
यावल पो. स्टे. हद्दीतील स्थानबद्ध इसम आकाश मधुकर बिरहाडे वय २२ रा.सिध्दार्थ नगर याच्या विरुध्द भादंवि कायदयाअंतर्गत १० गुन्हे दाखल आहेत. यावल पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांनी एमपीडीए प्रस्ताव तयार करुन प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेकडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार जळगाव जिल्हाधिकारी यांनी त्यास मुंबई कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार यावल पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर, पोहेकों वासुदेव मराठे अशांनी स्थानबध्द इसमाला ताब्यात घेतले आहे. स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.
फैजपूरच्या डॉनची मुंबई कारागृहात रवानगी
फैजपूर पो.स्टे.हद्दीतील स्थानबद्ध इसम प्रविण ऊर्फ डॉन गोपाळ तायडे वय-२८ रा.पाडळसा ता.यावल जि.जळगाव याचे विरुध्द भादंवि व दारुबंदी कायदया अंतर्गत १३ गुन्हे दाखल आहेत. फैजपूर पो.स्टे.चे सहा.पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी एमपीडीए तयार करुन हा प्रस्ताव हा स्था.गु.शा.जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यास मुंबई कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार फैजपूर पो.स्टे.चे तत्कालीन सहा.पोलीस निरीक्षक, निलेश वाघ, सहा. पोलीस निरीक्षक, रामेश्वर मोताळे, पोउनि मैनुद्दीन सैय्यद, पोहेकॉ योगेश महाजन, किशोर इंगळे अशांनी स्थानबध्द इसमाला ताब्यात घेतले आहे. पथक त्यास मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे दाखल करण्यासाठी रवाना झाले आहे.