राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्हा कार्यालयात पक्षध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पक्षाच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा तसेच शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा संकल्प करण्यात आला. पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी समाजकारणाला प्राधान्य देत महिला आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तसेच युवकांच्या रोजगारासाठी आयटी क्षेत्राला चालना देण्यासारखी अनेक महत्त्वपूर्ण कामे केल्याचे सांगितले. ही कार्ये जनतेपर्यंत पोहोचविण्याची शपथही यावेळी घेण्यात आली.
कार्यक्रमात केक कापून पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव शहर महानगराध्यक्ष ईजाज मलिक यांच्या हस्ते पक्षध्वजारोहण करण्यात आले. ध्वजस्तंभ पूजन माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि जिल्हा समन्वयक विकास पवार यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वाय. एस. महाजन यांनी केले. यावेळी मंगलाताई पाटील, एस. डी. पाटील, महाडिक सर, विलास पाटील, राजेश गोयल, जयप्रकाश चांगरे, डी. एम. पाटील, रिकू चौधरी, विनायक पाटील, सुनील माळी, गौरव पाटील, रमेश पाटील, गिरीश सांगळे, अकिल पटेल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाय. एस. महाजन यांनी केले. पक्ष संघटना अधिक बळकट करून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा हा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






