लोहारा येथे सुकी नदीवरील पुलावर वाहतूक बंद

लोहारा येथे सुकी नदीवरील पुलावर वाहतूक बंद
वाढत्या पाणीप्रवाहामुळे प्रशासनाची प्रतिबंधात्मक कारवाई; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
रावेर | प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील लोहारा गावाजवळील सुकी नदीला मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीवरील पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत पुलावरील वाहतूक बंद केली आहे.
सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संबंधित पुलावर बॅरिकेड्स उभारून सर्व प्रकारची वाहतूक थांबविण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून परिसरात सतर्कता ठेवण्यात येत असून नागरिकांना पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे सुकी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह कमी होऊन परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, नागरिकांनी नदी, नाले, पूल आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.







