ब्रेकिंग : जळगावात शेअर घोटाळ्याचा धुमाकूळ, उद्योजकाची २.५५ कोटींची लूट!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याच्या लोभाने एका पॅकेजिंग उद्योगाच्या मालकाला फसवण्यात आले. एका लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर अवघ्या एका दिवसात ५० हजार रुपयांचा नफा दाखवून विश्वास संपादन केला आणि काही दिवसांतच त्याच्याकडून २.५५ कोटी रुपये उकळले. ही घटना उघड झाल्यानंतर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तुजा खानभाई लोखंडवाला (४२, रा.तारा बिझनेस पार्क, कुसुंबा, जळगाव) यांना व्हॉट्सअॅपवरून ‘क्रिस्टन’ नावाच्या व्यक्तीकडून संपर्क झाला. त्याने ‘आरयूएसएल-सी सीएम’ नावाच्या कथित शेअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. २१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत तीन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून (९७७९६४८२३६, ७७४१३१९३३६ आणि ७७४९८९८९३७) त्यांना २ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. बदल्यात १५ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले, पण रक्कम काढण्यासाठी आणखी पैसे मागितले.
तीन बँकांद्वारे १३ व्यवहार
लोखंडवाला यांनी या कालावधीत ५० हजार, १ लाख, ५ लाख, १० लाख, २० लाख आणि ४० लाख अशा रकमांचे १३ व्यवहार केले. हे पैसे ‘आरयूएसएल-सी सीएम’ अॅप आणि http://m.russellcm.net/ या लिंकद्वारे अॅक्सिस बँक, बंधन बँक आणि आयसीआयसीआय बँकांद्वारे भरले गेले.
विश्वास बसवण्यासाठी पहिला नफा परत
फसवणूककर्त्यांनी सुरुवातीला विश्वास जिंकण्यासाठी १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ४९,५०० रुपयांचा नफा दाखवला आणि तो काढूही दिला. यामुळे उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. वेळोवेळी मिळालेल्या रकमेवर नफा ऍपमध्ये दाखवण्यात येत होता.
१ कोटी गुंतवले तरी काढता येत नाही रक्कम
लोखंडवाला यांनी १ कोटी रुपये गुंतवल्यानंतर रक्कम काढण्यासाठी साडेतीन कोटी भरावे लागतील, असे सांगण्यात आले. नंतर आणखी गुंतवणुकीचे आमिष दाखवून रक्कम २.५ कोटींवर नेली. १५ कोटी नफा दाखवला, पण काढण्यासाठी पुन्हा पैसे मागितले तेव्हा फसवणूक उघड झाली.
सप्टेंबरमध्ये पाच फसवणुकीच्या घटना
सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १९ दिवसांतच पाच जणांची मोठी फसवणूक झाली आहे. यात दोन प्रकरणांत प्रत्येकी साडेसात लाख, एकात साडेबारा लाख, तर २४ लाख आणि ४५ लाख रुपयांच्या फसवणुकीचा समावेश आहे. ही नवीन घटना आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. मागील वर्षी जळगाव सायबर पोलिसांकडे १ कोटी ६ लाख रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंदला होता.
कंपनी नावे बदलून करतात फसवणूक
या प्रकारच्या घोटाळेबाज सेबी-नोंदणीकृत कंपन्यांच्या नावाशी साम्य असलेली बनावट नावे वापरतात आणि वारंवार बदलतात. नागरिकांनी अशा लोभाला बळी न पडता गुंतवणुकीपूर्वी तपासणी करावी, असे जळगाव सायबर विभागाचे प्रमुख निरीक्षक सतीश गोराडे यांनी आवाहन केले आहे.






