
घरफोडी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ‘हग्गु’च्या मुसक्या आवळल्या!
टीव्हीसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत ; रामानंदनगर पोलिसांची कारवाई
जळगाव I महा पोलीस न्यूज : शहरातील शामनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा तपास करत रामानंदनगर पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे. घरफोडी करून पसार झालेल्या संशयिताला जळगाव रेल्वेस्थानकावरून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी दोघांचा सहभाग निष्पन्न झाला असून ते फरार आहेत.
शामनगर परिसरातील रहिवासी किरण नंदकिशोर वासेवाय हे १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. १५ नोव्हेंबर रोजी ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, ४३ इंची टीव्ही आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तांत्रिक तपासातून आरोपींचा माग
घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोधपथकाला विशेष सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि तपासाची दिशा निश्चित केली. या तपासातून राजीव गांधी नगर परिसरातील शक्तीसिंग ऊर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी याचा सहभाग समोर आला. त्याच्यासोबत अन्य दोन साथीदारांनीही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांकडून शोध सुरू असताना हग्गुसिंग हा घरी मिळून येत नव्हता.
रेल्वेस्थानकावरून आरोपीला पकडले
१९ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांना हग्गुसिंग जळगाव रेल्वेस्थानकावरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोधपथकाचे अधिकारी उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि त्यांच्या पथकाने तातडीने रेल्वेस्थानक गाठले. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या हग्गुसिंगला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
पोलिस कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत त्याने सुबेरसिंग राजुसिंग टाक आणि शेरुसिंग सोजितसिंग भोंड (दोघे रा. आत्महत्या कॉलनी, जळगाव) यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही जप्त
पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालात पाच ग्रॅम व एक ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप, एक ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुली, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन भार वजनाचा चांदीचा गोफ, एक भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट, पाच भार वजनाच्या चांदीच्या तोरड्या, चांदीचे देव, कडे व फुलपात्र तसेच सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही यांचा समावेश आहे.
या गुन्ह्यातील सुबेरसिंग टाक आणि शेरुसिंग भोंड हे दोघे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वारुंगसे, गुन्हे शोधपथकाचे अधिकारी उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, उपनिरीक्षक संजय तडवी, पोलिस हवालदार जितेंद्र राजपूत, पोलिस नाईक योगेश बारी, तसेच पोलिस कर्मचारी सुमेध इंधाटे, मुकुंद गवते, मनोज मराठे, सागर नन्नवरे, जुलालसिंग परदेशी आणि मोतीलाल चौधरी यांनी सहभाग घेतला.







