ब्रेकिंग : जळगावात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५१ लाखांची फसवणूक
एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल : मुदत संपल्यानंतरही मुद्दल आणि परतावा न मिळाल्याने पोलिसांत धाव

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल ५१ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी दीपक माधवराव सुरळकर (वय ४३, व्यवसाय – नोकरी, रा. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित तेजस युवराज रेडे, युवराज दत्तात्रय रेडे, नयना युवराज रेडे आणि हिमाणी ऊर्फ हिना युवराज रेडे यांनी संगनमत करून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. संशयित तेजस रेडे याने स्वतःच्या शेअर मार्केटमधील व्यवहारांचा संदर्भ देत गुंतवणुकीसाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला ऑनलाइन पद्धतीने पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला गुंतवणुकीवर ५ ते ८ टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
वेगवेगळ्या टप्प्यांत ५१ लाख २० हजार रुपये जमा
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, १४ ऑगस्ट २०२५ पासून १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संशयितांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाइन स्वरूपात मोठ्या रकमा पाठविण्यात आल्या. यामध्ये तेजस रेडे याच्या सांगण्यावरून एचडीएफसी बँकेतील खात्यावर तसेच अन्य संबंधित बँक खात्यांवर रक्कम वर्ग करण्यात आली. गुंतवणुकीच्या व्यवहारांसाठी विविध बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विशेष म्हणजे, गुंतवणुकीच्या रकमेवर नियमित परतावा मिळत असल्याचा विश्वास निर्माण करून पुढील गुंतवणुकीसाठीही फिर्यादीला प्रोत्साहित करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुदत संपली, मात्र ना परतावा ना मुद्दल
गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊनही ठरलेल्या मुदतीनंतर रक्कम परत मिळाली नसल्याने फिर्यादीने संशयितांकडे पैशांची मागणी केली. मात्र, गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावरील परतावा देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय, गुंतवणुकीच्या व्यवहारांशी संबंधित काही धनादेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित धनादेश वटविण्यासाठी बँकेत सादर केले असता त्यावर ‘Drawer Signature Differs’ असा शेरा देत धनादेश परत आल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दीपक सुरळकर यांनी पोलिसांत धाव घेतली.
सात जणांकडून ५१ लाख २० हजारांची ऑनलाइन गुंतवणूक
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणुकीसाठी विविध व्यक्तींकडूनही रक्कम जमा करण्यात आली होती. त्यात पुढीलप्रमाणे रकमेचा उल्लेख आहे. दीपक माधवराव सुरळकर – ३ लाख रुपये, समेश विष्णू सुरळकर – १५ लाख ५० हजार रुपये, रमेश प्रभाकर फडके – २ लाख रुपये, मानसी फडके – १ लाख रुपये, पुष्पजित गोविंद पाटील – ९ लाख ७० हजार रुपये, हर्षदा महेश सोनार – १५ लाख रुपये, सचिन आनंदाराम देसले – ५ लाख रुपये अशा प्रकारे एकूण ५१ लाख २० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात गुंतविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.५१ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३७१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली हे.
आणखी किती जणांची फसवणूक?
शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. संशयितांनी नेमक्या कोणत्या पद्धतीने गुंतवणुकीचे जाळे उभारले, आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे आणि गुंतवणुकीची रक्कम कुठे वळविण्यात आली, याचा तपासातून उलगडा होण्याची शक्यता आहे.







