Crime

धानोऱ्यात दोन घरांना भीषण आग; लाखोंचे नुकसान!

अग्निशमन बंब दीड तास उशिराने दाखल; शॉर्टसर्किटचा अंदाज : ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात

धानोऱ्यात दोन घरांना भीषण आग; लाखोंचे नुकसान!

अग्निशमन बंब दीड तास उशिराने दाखल; शॉर्टसर्किटचा अंदाज : ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात

धानोरा, ता. चोपडा धानोरा गावात गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत दोन घरांचे मोठे नुकसान झाले असून, या दुर्घटनेत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. रात्री साडेआठच्या सुमारास शेख मुसा यांच्या लाकडी घरात अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करीत शेजारील घरालाही विळखा घातला. या आगीत शिक्षक तथा पत्रकार प्रशांत सुरेश सोनवणे यांच्या तीन मजली इमारतीतील चार खोल्यांना आगीची झळ बसली. आगीचे नेमके कारण शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
गुरुवार दि. 19 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शेख मुसा यांच्या घरात अचानक आग लागली. घर लाकडी स्वरूपाचे असल्याने आगीने काही वेळातच वेगाने पेट घेतला. घरातील ज्वलनशील साहित्यामुळे आगीचा भडका वाढत गेला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आगीने शेजारील प्रशांत सोनवणे यांच्या तीन मजली इमारतीला वेढा दिला. आगीची तीव्रता वाढल्याने प्रशांत सोनवणे यांच्या इमारतीतील चार खोल्यांनी पेट घेतली. श्री. सोनवणे यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य, वस्तू आणि दोन तोळे सोने, रोख रक्कम, भाचीच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. यात साधारण 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वेळीच प्रसंगावधान राखल्याने घरातील पाच जणांचे जीव देखील वाचले. दोन्ही घरांमध्ये आग पसरल्याने मोठ्या नुकसानीची भीती निर्माण झाली होती. आगीच्या तीव्रतेमुळे नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. मात्र, अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल दीड तास लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. नुकसानीचा महसूल विभागातर्फे पंचनामा करण्यात आला आहे.

ग्रामस्थांचे प्रयत्न, अग्निशमन बंबाची प्रतीक्षा
आगीने विक्राळ स्वरूप धारण केले असताना गावातील तरुणांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरांना लागलेली आग शेजारील इतर घरांपर्यंत पोहोचू नये, यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अग्निशमन बंब उशिराने दाखल झाल्याने नागरिकांचा संतापही व्यक्त होत होता. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना मदत केली.

आठवडाभरात दुसरी घटना; अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर
धानोरा परिसरात आगीची ही घटना काही पहिलीच नाही. गेल्या आठवड्यात याच परिसरातील एका कापड दुकानाला आग लागली होती. त्या घटनेतही लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. एका आठवड्याच्या अंतरात आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्याने परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार आगीच्या घटना घडत असताना गाव आणि परिसरासाठी स्वतंत्र किंवा तत्काळ उपलब्ध अग्निशमन व्यवस्था असावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महावितरणच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
या आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने महावितरणच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्नही चर्चेत आला आहे. परिसरात वारंवार शॉर्टसर्किटच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी असून, विद्युत वाहिन्या, जोडण्या, रोहित्रे आणि घरगुती वीजजोडणींची तपासणी करण्याची मागणी होत आहे. विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यानंतरच उपाययोजना करण्याऐवजी नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. विशेषतः जुन्या घरांमधील वायरिंग, क्षमतेपेक्षा अधिक विद्युत भार आणि सैल जोडण्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button