Other

खत वितरण सुलभ करण्यासाठी आमदार अमोल जावळेंची मागणी

खत वितरण सुलभ करण्यासाठी आमदार अमोल जावळेंची मागणी

केंद्र व राज्य सरकारकडे नऊ सुधारणांचे प्रस्ताव; शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यावर भर

रावेर ,प्रतिनिधी : रासायनिक खतांच्या वितरण प्रक्रियेत शेतकरी, सहकारी संस्था आणि खासगी खत विक्रेत्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून खत वितरण व्यवस्था अधिक सुलभ व पारदर्शक करण्याची मागणी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खत विभागाचे संयुक्त सचिव कृष्णकांत पाठक यांना निवेदन सादर करून नऊ महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविल्या आहेत.

सध्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (Framework for Fertilizer Sale) या प्रणालीद्वारे खत वितरण करताना शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेतीची गरज आणि उपलब्ध खत वितरण प्रणाली यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तातडीने सुधारणा करणे आवश्यक असल्याचे आमदार जावळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

नऊ महत्त्वपूर्ण सुधारणा

निवेदनात कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार पिकनिहाय खतांचा कोटा निश्चित करणे, प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्रानुसार खतांचे प्रमाण ठरविणे, नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) घटकांच्या प्रमाणानुसार खतांचे नियोजन करणे, तसेच बहुपिक पद्धतीनुसार स्वतंत्र खत कोट्याची सुविधा उपलब्ध करून देणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

याशिवाय कृषी विद्यापीठांच्या सुधारित शिफारशींचा डेटाबेस नियमित अद्ययावत करणे, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त गावाबाहेर राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नॉमिनी नोंदणीची सुविधा उपलब्ध करणे, प्रत्येक व्यवहारासाठी शेतकऱ्याच्या मोबाईलवर वारंवार ओटीपी मागविण्याऐवजी नोंदणीकृत नॉमिनीच्या माध्यमातून ओटीपी पडताळणी करणे आणि बारकोड स्कॅनिंगद्वारे खत वितरण प्रक्रिया सुलभ करणे, अशा सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत.

तसेच प्रणालीतील तांत्रिक अडचणींचे कायमस्वरूपी निराकरण होईपर्यंत सहकारी संस्था आणि खासगी खत विक्रेत्यांच्या माध्यमातून पर्यायी खत वितरण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

केंद्र-राज्य समन्वयावर भर

या प्रश्नावर केवळ केंद्र स्तरावर निर्णय न घेता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, सहकार विभाग आणि संबंधित तांत्रिक विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार जावळे यांनी केली आहे. या बैठकीत शेतकरी, सहकारी संस्था आणि खासगी खत विक्रेत्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून खत वितरण प्रणालीत आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या गरजेनुसार वेळेत खते उपलब्ध व्हावीत, हा या निवेदनामागील मुख्य उद्देश असल्याचे आमदार अमोल जावळे यांनी स्पष्ट केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button