दहशतवादी हल्ला किंवा स्फोटाच्या प्रसंगी काय करावे? यवतमाळमध्ये जिल्हा पोलिसांची रंगीत तालीम
बॉम्ब कॉलची मॉक ड्रील नव्या बसस्थानकात पार; नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन

यवतमाळ महापोलीस न्यूज l 10 मे 2025 l भारत-पाकिस्तान युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोटाच्या प्रसंगी आपत्कालीन प्रतिसादाची तयारी तपासण्यासाठी १० मे २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान यवतमाळच्या नवीन बस स्थानकावर बॉम्ब कॉलची रंगीत तालीम (मॉक ड्रील) पार पडली.
सदर तालमीदरम्यान पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, नवीन बस स्थानकाच्या पार्किंगमध्ये अज्ञात व्यक्तीने घातपाताच्या उद्देशाने बॉम्ब ठेवला आहे. यावरून जिल्हा पोलिस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. बॉम्ब शोधक व नाशक पथक, QRT, स्थानिक पथके आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
तपासादरम्यान संशयित बॉम्ब सापडल्याचे गृहीत धरून त्याला बस स्थानकाजवळील निर्मनुष्य ठिकाणी हलवण्यात आले आणि डिफ्यूज न होणारा बॉम्ब असल्यामुळे सुरक्षितपणे ब्लास्ट करून निकामी करण्यात आला. यानंतर फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी भौतिक पुरावे गोळा करण्यात आले. या कालावधीत रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता, जो नंतर वाहतूक शाखेच्या मदतीने सुरळीत करण्यात आला.
तालमीदरम्यान पोलीसांनी आणि इतर आपत्कालीन यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून प्रत्यक्षात काय करावे हे प्रात्यक्षिक स्वरूपात नागरिकांना दाखवले.
ही मॉक ड्रील पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विजय नाफडे आणि दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यवाहीत सपोनि सारंग बोम्पीलवार (दहशतवादविरोधी शाखा), पोउपनि उल्हास परांडे (बॉम्ब पथक), संजय धवणे (QRT), तसेच विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अग्निशमन, वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले.
दहशतवादी हल्ला अथवा संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. यवतमाळ जिल्हा पोलिस दलाने नागरिकांना 07232-242700 किंवा डायल 112 या क्रमांकांवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.