
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
चार हजारांहून अधिक वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा अद्वितीय सोहळा
पाळधी/जळगाव, प्रतिनिधी : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना आषाढी एकादशी निमित्त विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे जळगाव शहर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेले.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. विठ्ठलाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकऱ्यांना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर होते.
दुपारपासूनच जी.एस. ग्राऊंडवर हजारो वारकरी एकत्र जमले होते. नोंदणीकृत भाविकांना ओळखपत्रे, प्रवास पास आणि आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले. त्यानंतर जी.एस. ग्राऊंडवरून नेहरू चौक मार्गे रेल्वे स्थानकापर्यंत निघालेल्या भव्य पालखी-दिंडीने संपूर्ण शहर विठ्ठलमय झाले.
टाळ, मृदंग, अभंग, फुगड्या, रिंगण, भगव्या पताका आणि “ज्ञानोबा-तुकोबा… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” या जयघोषात हजारो वारकरी विठ्ठलनामात तल्लीन झाले होते. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले आणि वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतः दिंडीत सहभागी झाले. त्यांनी टाळ वाजवत वारकऱ्यांसोबत अभंगांचा गजर केला तसेच प्रतापराव पाटील, विकी पाटील आणि गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासमवेत फुगडीही खेळली. यामुळे वारकऱ्यांचा उत्साह अधिकच वाढला.
‘विठू माऊली तू माऊली जगाची…’ गीताने भारावले वातावरण
कार्यक्रमातील सर्वाधिक भावस्पर्शी क्षण तेव्हा अनुभवायला मिळाला, जेव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “विठू माऊली तू माऊली जगाची…” हे भक्तिगीत सादर केले. हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात त्यांना उत्स्फूर्त साथ दिली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल” या नामगजराने दुमदुमून गेला.
सूक्ष्म नियोजनामुळे उपक्रम ठरला यशस्वी
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन युवा नेते प्रतापराव पाटील आणि जीपीएस मित्रपरिवाराने केले. रेल्वेतील प्रत्येक डब्यात स्वयंसेवक, डॉक्टर, प्रथमोपचार पेटी, औषधे, पिण्याचे पाणी, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पंढरपूर येथे निवास, महाप्रसाद, चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ, भजन आणि कीर्तनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी, माळकरी आणि महिला भाविक उपस्थित होते.
विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने निरोप दिला. रेल्वे सुटताच संपूर्ण स्थानक “ज्ञानदेव… तुकाराम…” या अखंड गजराने दुमदुमून गेले आणि भक्ती, श्रद्धा व समर्पणाचा अविस्मरणीय सोहळा अनुभवण्याचे भाग्य जळगावकरांना लाभले.





