ग्रामसभेत ग्रामसेवकावर हल्ला; जीव वाचवण्यासाठी पळताना मृत्यू, एक आरोपी अटक
पारोळा पोलिसांची तत्काळ कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रामसभेत ग्रामसेवकावर हल्ला; जीव वाचवण्यासाठी पळताना मृत्यू, एक आरोपी अटक
पारोळा पोलिसांची तत्काळ कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पारोळा : तालुक्यातील शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्यावर जुन्या बिलांच्या कारणावरून काही ग्रामस्थांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सात जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पळत असताना पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जुन्या बिलांच्या कारणावरून वाद
ग्रामसभेदरम्यान जुन्या बिलांच्या मुद्द्यावरून ग्रामसेवक प्रल्हाद पाटील आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सात जणांनी पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सात जणांविरुद्ध गुन्हा
घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी विलंब न करता तत्काळ कारवाई केली. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ३१५/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
मुख्य आरोपीला अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पारोळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी या प्रकरणातील एका मुख्य आरोपीला तत्काळ अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.
अंत्यसंस्कारासाठी पोलिस बंदोबस्त
मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर आज, १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळ गावी बोधर्दे (ता. पारोळा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात योग्य तो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.







