Other

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७९ कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७९ कोटींची मदत

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सर्वाधिक ६१७ रुग्णांना १२.२३ कोटींची आर्थिक मदत

मुंबई : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अनेक रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा उपचाराचा महत्त्वाचा पर्याय ठरतो. मात्र, या उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर मोठे आव्हान उभे राहते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरजू रुग्णांसाठी आधार ठरत आहे.

आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी राज्यातील ७९८ रुग्णांना एकूण १५ कोटी ७९ लाख ६६ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सर्वाधिक मदत

या कालावधीत मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ६१७ रुग्णांना १२ कोटी २३ लाख ६६ हजार रुपये मदत देण्यात आली. यकृत प्रत्यारोपणासाठी १६२ रुग्णांना ३ कोटी २१ लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले.

फुप्फुस प्रत्यारोपणासाठी ३ रुग्णांना ६ लाख रुपये, तर हृदय प्रत्यारोपणासाठी १६ रुग्णांना २८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

रुग्णकेंद्रित आणि ऑनलाइन व्यवस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची कार्यपद्धती अधिक गतिमान व रुग्णकेंद्रित करण्यात आली आहे.

रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाइन प्रणालीही सुरू करण्यात आली आहे.

रुग्णालयामार्फत थेट अर्ज

नव्या प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना वैद्यकीय मदत अधिक वेगाने मिळण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे, आता मदतीसाठीचा अर्ज रुग्णाऐवजी कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयामार्फत थेट सादर केला जातो. त्यामुळे रुग्णांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज राहत नाही.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याने गंभीर आजारांवरील उपचारांना गती मिळत आहे.

अवयव प्रत्यारोपणासाठी मदतीचा तपशील

प्रत्यारोपण| लाभार्थी रुग्ण| आर्थिक मदत
मूत्रपिंड| ६१७| ₹१२.२३ कोटी
यकृत| १६२| ₹३.२१ कोटी
फुप्फुस| ३| ₹६ लाख
हृदय| १६| ₹२८.५० लाख
एकूण| ७९८| ₹१५.७९ कोटी

“प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली”

«“अवयव प्रत्यारोपणासारख्या खर्चिक उपचारांसाठी आर्थिक मदत वेळेत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळावी, यासाठी संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान आणि अद्ययावत करण्यात आली आहे. गरजू रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.”»

— रामेश्वर नाईक
कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button