धुळे पोलिसांचे संवेदनशील आणि तत्पर कर्तृत्व!

धुळे पोलिसांचे संवेदनशील आणि तत्पर कर्तृत्व! आत्महत्येचा प्रयत्न रोखून एका तरुणाचा जीव वाचवला
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्हा पोलीस दलाच्या तत्परतेने आणि संवेदनशीलतेने एका तरुणाचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. घरगुती वादातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला योग्य वेळी अडवून पोलिसांनी त्याला नवजीवन दिले. या घटनेनंतर धुळे जिल्हा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
आमीन पिंजारी (रा. शिरपूर) या तरुणाचा मंगळवारी रात्री त्याच्या वडिलांसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्याचा इशारा देत घराबाहेर काढता पाय घेतला. काही वेळाने त्याच्या वडिलांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो शिरपूर येथील तापी नदीकडे निघाल्याचे समजले.
घाबरलेल्या अवस्थेत वडिलांनी रात्री ११.१५ वाजता पोलीस हवालदार अविनाश प्रभाकर चंद्रा (पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे) यांना संपर्क केला. त्यांनीही क्षणाचाही विलंब न करता नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राकेश शिरसाठ यांना माहिती दिली.
संवेदनशील प्रतिसाद आणि जलद कारवाई
हवालदार शिरसाठ यांनी रात्रगस्त पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि पोलीस हवालदार गवळी यांच्याशी संपर्क साधला. तात्काळ तापी पुलावर पोहोचून बॅरिकेड्स लावण्यात आले आणि वाहनांची चौकशी सुरू करण्यात आली.
अवघ्या १० मिनिटांतच आमीन पिंजारी याला तपासणीत गाठण्यात आले. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन नरडाणा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. काही वेळातच आमीनचे कुटुंबीय पोहोचले, आणि पोलिसांनी त्याची समजूत घालून त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
समाजासाठी पोलीस दलाची सकारात्मक भूमिका
या घटनेमुळे एका कुटुंबाचा आधारस्तंभ वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. आमीनच्या मागे वृद्ध आई-वडील, दोन भाऊ, एक अविवाहित बहीण, पत्नी आणि दोन लहान मुले असा मोठा परिवार आहे.
पोलीस हवालदार अविनाश चंद्रा, राकेश शिरसाठ, उपनिरीक्षक सोनवणे आणि हवालदार गवळी यांच्या तातडीच्या कृतीमुळे धुळे जिल्हा पोलीस दलाची कर्तव्यनिष्ठा आणि मानवी दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे.
पिंजारी कुटुंबीयांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करत जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.