अपूर्ण घरकुले तत्काळ पूर्ण करा : मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे लाभार्थ्यांना आवाहन

अपूर्ण घरकुले तत्काळ पूर्ण करा : मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे लाभार्थ्यांना आवाहन
जळगाव, (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-१ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण ७६ हजार ७५४ घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ घरकुले अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. या अपूर्ण घरकुलांची संख्या कमी करून सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्हाभरातील अपूर्ण घरकुलांना प्रत्यक्ष भेटी देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येत असून घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अपूर्ण घरकुलांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर लवकरात लवकर मिळावे यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर या तालुकास्तरीय गटविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा दैनंदिन आढावा घेत आहेत. तसेच गटविकास अधिकाऱ्यांनाही घरकुल भेटींची उद्दिष्टे निश्चित करून देण्यात आली आहेत. नायर स्वतःही गावागावांत जाऊन लाभार्थ्यांच्या भेटी घेत असून त्यांच्या अडचणी जाणून घेत घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.
ज्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी पहिला, दुसरा किंवा तिसरा हप्ता प्राप्त झाला आहे, त्यांनी प्राधान्याने घरकुलांचे बांधकाम पूर्ण करून आपल्या हक्काच्या घरात स्थलांतरित व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे.गुरुवार दि.१८ जून रोजी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथे भेट देऊन अपूर्ण घरकुलांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पारोळा येथील गट विकास अधिकारी भूषण कदम यांचेसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कर्मचारी व अधिकारी देखील मिशन मोड वर अपूर्ण घरकुलाबाबत काम करीत आहेत. अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस.लोखंडे यांनी दिली आहे.
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लाभार्थी यांनी समन्वयाने काम केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक पात्र कुटुंबाला सुरक्षित व सन्मानजनक निवारा उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






