तालुका व शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 29 रोजी भव्य बूथ कार्यकर्ता मेळावा

तालुका व शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 29 रोजी भव्य बूथ कार्यकर्ता मेळावा
आमदार अनिल पाटील फुंकणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे रणशिंग
पंकज शेटे अमळनेर :-,अमळनेर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कलागुरु मंगल कार्यालय,अमळनेर येथे करण्यात आले आहे.
माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार असून सदर मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.आगामी काळात होणारी नगरपरिषद निवडणूक आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहर व ग्रामिण भागाचा संयुक्त मेळावा होत आहे.मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक नुकतीच आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली .
होती,ग्रामिणच्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून महायुती बाबत सकारात्मकता दर्शविण्यात येऊन आमदार पाटील जो निर्णय घेतील तो मान्य राहील असा सूर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर.शहराच्या बैठकीत देखील भाजपाला एकत्र घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली मात्र निवडणूक शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविली जावी असा आग्रह माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी घेतला. मात्र यासंदर्भात 29 रोजीच्या मेळाव्यानंतर नेते मंडळींचे मार्गदर्शन घेऊन व महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असा निर्णय आमदार पाटील यांनी जाहीर करत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन्ही निवडणूका जोमाने लढवून कार्यकर्त्याना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला.यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.दोन्ही बैठकीत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
दरम्यान जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या बळावर अमळनेर तालुका शहर विकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.तरी सदर मेळाव्यास शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते,बूथ कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.






