राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा संकल्प अभियान’


राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा संकल्प अभियान’
१७ ऑक्टोबरपर्यंत विविध शासकीय सेवा व योजनांचा नागरिकांना थेट लाभ; तालुकास्तरावर सेवा सेतू अभियान, सेवा समाधान शिबिरे आणि विविध लोकोपयोगी उपक्रम
जळगाव | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त तसेच विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू अभियान’ राबविण्यात येणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा पात्र नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शक्य त्या सेवा जागेवरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तालुकास्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार असून, वन हक्क दाव्यांची सुनावणी आणि मंजुरीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे.
२२ शासकीय सेवा नागरिकांच्या दारी
‘सेवा सेतू अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जिवंत सातबारा मोहीम, स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते, शिधापत्रिका वितरण, नॉन-क्रिमीलेअर व दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहन चालक परवाना, नवीन नळ व घरगुती वीज जोडणी, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासह विविध २२ सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
युवा व नवसंशोधकांसाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’
युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि ग्रामीण नवसंशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग या उपक्रमासाठी नोडल विभाग म्हणून काम पाहणार आहे.
‘सेवा माझे योगदान’ उपक्रमातून २६ लोकोपयोगी उपक्रम
‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव आणि प्रभागात स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, रस्ते सुरक्षा जनजागृती, शासकीय योजनांची माहिती, प्लास्टिकमुक्ती आणि डिजिटल साक्षरता यांसह २६ लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
‘सेवा ज्योत यात्रा’द्वारे विकसित भारताचा संकल्प
‘विकसित भारत संकल्प व सेवा ज्योत यात्रा’ उपक्रमांतर्गत राज्यातील परिवर्तनकारी प्रकल्पांची माहिती जनसंपर्क विभागामार्फत नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. गावोगावी आणि शहरांमध्ये बाइक रॅली तसेच ‘सेवा ज्योत यात्रा’ काढून विकसित भारत २०४७ चा संकल्प करण्यात येणार आहे.
शाळा, अंगणवाड्यांमध्येही विविध उपक्रम
शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असून, विजेत्यांचे जिल्हा व राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये माता-बालकांसाठी पोषण व आरोग्य मार्गदर्शन करण्यात येणार असून, आशा आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मानही केला जाणार आहे.
२ ऑक्टोबरला योजनांवर आधारित नाट्यप्रयोग
२ ऑक्टोबर रोजी कलापथकांमार्फत विविध शासकीय योजनांची माहिती देणारे नाट्यप्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून शासकीय योजना आणि सेवांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
१७ ऑक्टोबरला ‘जनसेवक महाकुंभ’
१७ ऑक्टोबर २०२६ रोजी सरपंचांपासून संसद सदस्यांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींचा ‘जनसेवक महाकुंभ’ आयोजित करून अभियानाची सांगता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी विकसित भारताचा संकल्प घेणार आहेत. या उपक्रमासाठी ग्रामविकास विभाग नोडल विभाग म्हणून काम पाहणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्यस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.







