अमळनेर येथे अनोळखी वृद्धाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

अमळनेर येथे अनोळखी वृद्धाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर शहरातील इदगाह रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्तानाजवळ एका अनोळखी वृद्ध इसमाचा संशयित अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 23 जून) सकाळी 8.18 वाजेच्या सुमारास इदगाह रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्तानाजवळ रस्त्यावर एक अनोळखी इसम पालथा पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याचा संशय असून त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती.
घटनास्थळावरून त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी शेख रियाजोद्दीन रुक्नोद्दीन (वय 48, रा. दर्गाअली मोहल्ला, गांधलीपुरा, अमळनेर) यांनी दिलेल्या माहितीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्र. 64/2026 दाखल करण्यात आली आहे.
या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद लक्ष्मण सोनवणे करीत आहेत.
सदर वर्णनाच्या अनोळखी मृत इसमाची ओळख कोणाला पटत असल्यास त्यांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे






