भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरू नका; सतर्क राहा, प्रशासन आपल्या पाठीशी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरू नका; सतर्क राहा, प्रशासन आपल्या पाठीशी – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सौम्य धक्के; जीवित अथवा वित्तहानीची प्राथमिक माहिती नाही
अफवांवर विश्वास ठेवू नका; नुकसान झाल्यास तात्काळ प्रशासनाला कळविण्याचे आवाहन
जळगाव :– भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही, ही दिलासादायक बाब आहे. प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत शासन आणि प्रशासन जिल्हावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.*
शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाचे धक्के जळगावसह धुळे, नंदुरबार, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही भागांतही जाणवल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले असून, आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासीयांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. कुठेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित तहसील कार्यालय, स्थानिक प्रशासन अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा. प्राप्त माहितीनुसार प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता एकमेकांना सहकार्य करावे. जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि प्रशासन सदैव तत्पर आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.







