
श्रीराम रथोत्सव मार्गांची तातडीने स्वच्छता करा; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आदेश
रथ व वहन मिरवणुकीपूर्वी रस्ते, नाले, गटारी स्वच्छ करण्याच्या सूचना
जळगाव, प्रतिनिधी : दीडशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी श्रीराम रथ आणि वहन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गांची तातडीने व सखोल स्वच्छता करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाला दिले.
कार्तिक शुक्ल एकादशीनिमित्त होणाऱ्या या उत्सवात प्रभू श्रीरामाच्या रथासह विविध वहनांची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होत असल्याने मिरवणूक मार्गावर स्वच्छता, आरोग्य आणि सुविधांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या.
मिरवणूक मार्गावरील कचरा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे, नाले व गटारींची सफाई तसेच आवश्यक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले. उत्सवापूर्वी आणि उत्सवादरम्यान स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असे उपमहापौरांनी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीस महानगरपालिका आरोग्य विभागाचे समीर बोरोले, तसेच BVG संस्थेचे व्यवस्थापक रेड्डी, जाधव आणि राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर उपमहापौरांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेच्या कामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.







