गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी
देशाच्या जडणघडणीत नेहरूंचे योगदान महत्त्वपूर्ण डॉ. प्रशांत वारके
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (गोदावरी आयएमआर) महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत वारके म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आधुनिक आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी पंडित नेहरू यांनी दूरदृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. आयआयटी, एम्स यांसारख्या शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांच्या उभारणीसह भाकरा नांगलसारख्या मोठ्या प्रकल्पांमधून देशाच्या विकासाचा पाया मजबूत करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. देशाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि पायाभूत विकासासाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले. त्या काळात आजच्यासारखी दळणवळणाची आधुनिक साधने, मोबाईल, इंटरनेट आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भक्कम पायाभरणी केली. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी वैयक्तिक संपत्तीचाही त्याग केला, असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी प्रा. आरती वर्मा यांनी पंडित नेहरू यांच्या देशाच्या जडणघडणीतील योगदानाचा आढावा घेतला. तसेच मुलांवरील त्यांचे प्रेम, शिक्षणाविषयीची बांधिलकी आणि शिक्षणाच्या माध्यमातून समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा त्यांनी दिलेला संदेश याविषयी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता चौधरी यांनी केले. पंडित नेहरू यांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता झाली.







