चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
जळगाव, प्रतिनिधी : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळगाव ते भोलाणे रस्त्यावरील आसोदा शिवारात एका शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. गलू देविदास कोळी (वय ३८, रा. भोलाणे, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. या मृत्यूमागे घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली असून, दुचाकी अपघातात मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
गलू कोळी हे ९ नोव्हेंबर रोजी जळगाव शहरात आले होते. दिवसभरातील कामे आटोपूनही ते संध्याकाळी घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिचितांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून न आल्याने रामानंद नगर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांकडून त्यांच्या शोधासाठी तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते एका व्यक्तीला सोडताना दिसून आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिस त्यांचा माग काढत असतानाच १३ नोव्हेंबर रोजी आसोदा शिवारातील एका शेतात मृतदेह आढळल्याची माहिती शेतकऱ्याने तालुका पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पडलेल्या दुचाकीवरून मृत तरुणाची ओळख पटविण्यात आली. गलू कोळी हे दुचाकीवरून गावाकडे परतत असताना रात्रीच्या वेळी वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती शेतात पडली असावी. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघात की घातपात, याबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.







