Other

भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार

भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार

भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू

भडगाव प्रतिनिधी भडगाव नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता क्रमांक ३०११ मधील भोगवट्याच्या जागेवरील कायदेशीर हक्कांबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने स्थानिक रहिवासी अविनाश श्रीकांत देशमुख यांनी दि. १६ रोजी सकाळी ११ वाजे पासुन नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागणी मान्य होईपर्यंत शांततेच्या व लोकशाही मार्गाने हे उपोषण सुरूच राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबतचे लेखी निवेदन व पूर्वसूचना त्यांनी दिनांक २ नोव्हेंबर रोजी भडगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केली होती.
दिलेल्या निवेदनानुसार, भडगाव नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता क्रमांक ३०११ येथील भोगवट्याच्या जागेसंदर्भात योग्य ती चौकशी करून नियमानुसार कार्यवाही व्हावी व सदर जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळावा, यासाठी देशमुख यांनी यापूर्वीच नगरपरिषदेकडे लेखी अर्ज आणि त्यानंतर स्मरण अर्ज सादर केले होते. मात्र, अर्ज सादर करून एक महिन्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही किंवा अर्जाच्या सद्यस्थितीबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आलेले नाही. वारंवार प्रत्यक्ष भेटून व लेखी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आपल्याला विनाकारण मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मालमत्ता क्रमांक ३०११ मधील भोगवट्याच्या जागेची सविस्तर चौकशी करावी, संबंधित अभिलेख व कागदपत्रांची तपासणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा, जागेचा प्रत्यक्ष ताबा द्यावा तसेच पूर्वीच्या अर्जावर काय कार्यवाही झाली याची लेखी माहिती द्यावी, अशा प्रमुख मागण्या देशमुख यांनी केल्या आहेत. विहित कालावधीत प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर त्यांनी आज सोमवार दिनांक १६ नोव्हेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

दरम्यान, या आंदोलनाची रीतसर पूर्वसूचना माहितीस्तव जिल्हाधिकारी (जळगाव), प्रांताधिकारी (पाचोरा-भडगाव), तहसीलदार (भडगाव) आणि भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली होती. आता उपोषण सुरू झाल्यानंतर तरी नगरपरिषद प्रशासन या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उपोषणकर्त्याला न्याय देते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button