
पाणीटंचाईतही पाण्याचा अपव्यय; व्हॉलमनवर कारवाई करण्याची महापौरांची मागणी
निर्धारित वेळेतच पाणीपुरवठा सुरू-बंद करण्याचे निर्देश देण्याची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली असताना काही प्रभागांमध्ये व्हॉलमनकडून सकाळपासून पाणीपुरवठा सुरू ठेवला जात असल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याची बाब समोर आली आहे. निर्धारित वेळेत पाणीपुरवठा बंद केला जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला मनोज काळे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या वारंवार तक्रारी
महापौर कार्यालयात नागरिक प्रत्यक्ष येऊन तसेच दूरध्वनीद्वारे पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी करीत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्हॉलमन यांना दूरध्वनीवरून सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पाणीपुरवठा विभागातील अधिकारीही या गंभीर समस्येकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले आहे.
एका भागात अपव्यय, दुसरीकडे टंचाई
शासनाने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक निर्देश दिलेले आहेत. असे असतानाही काही प्रभागांमध्ये अनावश्यक वेळ पाणीपुरवठा सुरू राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. परिणामी, इतर भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
प्रभागनिहाय पाहणी करण्याचे निर्देश द्या
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच सर्व प्रभागांतील व्हॉलमन यांना निर्धारित वेळेतच पाणीपुरवठा सुरू आणि बंद करण्याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी महापौर दीपमाला काळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.







