
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : रक्षा खडसे
भगवान बिरसा मुंडांचा क्रांतिकारी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवा : गिरीश महाजन; जनजातीय गौरव दिनानिमित्त जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव : आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाच्या योजनांसोबतच समाजातील सुशिक्षित नागरिक आणि युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
आदिवासी विकास विभागांतर्गत यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, केवळ रस्ते, पूल यांसारख्या भौतिक सुविधांचा विकास म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास नव्हे. त्यासाठी वैचारिक प्रगल्भताही तितकीच आवश्यक आहे. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबतच नागरिकांनीही सामाजिक दायित्वाच्या भावनेतून एकत्रित काम करणे गरजेचे आहे.
भगवान बिरसा मुंडांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवा

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी कार्याचा गौरव करताना त्यांचा संघर्ष आणि सर्वोच्च बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्याची गरज व्यक्त करताना बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यामुळे स्थानिक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाज शब्दाला जागणारा : स्मिता वाघ
आदिवासी समाज हा शब्दाला जागणारा असून तो जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच सांगतो, अशा शब्दांत खासदार स्मिता वाघ यांनी आदिवासी समाजाच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला. भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन या हक्कांच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला लढा ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आदिवासी समाजाची संस्कृती, पारंपरिक नृत्य आणि परंपरा यांचे जतन करून हा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श भावी पिढीने जोपासावा, असे आवाहनही त्यांनी केले.
चित्रमय जीवनपट आणि योजनांचे प्रदर्शन
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाच्या परिसरात भगवान बिरसा मुंडा यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रमय फलक आणि आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आला होता. तसेच आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारे फलकही लावण्यात आले होते.
पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटाला १० हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
जळगाव शहरात भव्य रॅली
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य रॅली काढण्यात आली. जी.एस. ग्राउंड येथून सुरू झालेली रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. या रॅलीत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी आभार मानले.
यावेळी आमदार सुरेश भोळे, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी रमेश धापके, तहसीलदार शितल राजपूत, सहायक प्रकल्प अधिकारी प्रविण दाभाडे, पवन पाटील, मिनाक्षी सुलताने, लेखाधिकारी दिपकांत वाघ, मनेश तडवी यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







