Other

जळगावात विजेच्या धक्क्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही मृत्यू; तुटून पडलेली वीजवाहक तार ठरली जीवघेणी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील असोदा रोड परिसरात मंगळवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. घराजवळ तुटून पडलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने मायलेकाचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईलाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

राहुल राजू सपकाळे (वय ३५) आणि सुनंदा राजू सपकाळे (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या घराजवळ वीजवाहक तार तुटून पडली होती. ही तार बाजूला करण्यासाठी राहुल पुढे गेला असता त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.

मुलाला विजेचा धक्का बसल्याचे पाहून आई सुनंदा यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने त्यांनाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. या दुर्घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांतच घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेनंतर दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली. मायलेकाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

या प्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घराजवळ तुटून पडलेल्या वीजवाहक तारांमुळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button