
महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । उत्तर महाराष्ट्राचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाणारे आणि सुमारे २५० वर्षांची अखंड आध्यात्मिक परंपरा लाभलेले श्री संत सखाराम महाराज देवस्थान वाडी संस्थान येथे १ जुलैच्या रात्री लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण राज्यातील वारकरी संप्रदायाला मोठा धक्का दिला. या दुर्घटनेत मंदिराचा सुमारे २५० वर्षे जुना ऐतिहासिक गाभारा जळून खाक झाला. सुदैवाने श्रींच्या मूर्ती आणि मुख्य मंदिर सुरक्षित राहिले; मात्र प्राथमिक अंदाजानुसार १५ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर काही दिवस भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर अमळनेरच्या श्रद्धास्थानाच्या पुनर्बांधणीसाठी राजकीय मतभेद आणि पक्षीय सीमा बाजूला ठेवत आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी एकत्रित पुढाकार घेतला. या विषयाला केवळ स्थानिक नव्हे तर राज्यस्तरीय महत्त्व मिळावे यासाठी दोन्ही नेत्यांनी विधिमंडळात प्रभावी पाठपुरावा केला.
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या विनंतीनुसार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानभवनात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ आणि ‘लक्षवेधी सूचना’ यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी वाडी संस्थान ही लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असून तिचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी असल्याचे ठामपणे मांडले.
दुसरीकडे आमदार अनिल पाटील यांनीही विधानसभेत हा विषय अत्यंत गांभीर्याने उपस्थित करून शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. आजी आणि माजी आमदारांनी एकाच उद्देशाने केलेल्या या प्रयत्नांचे अमळनेरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून स्वागत होत आहे.
आषाढीपूर्वी पुनर्बांधणीचे मोठे आव्हान
श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे उत्तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान असून ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला येथे हजारो-लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने त्यापूर्वी मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचे मोठे आव्हान प्रशासन आणि शासनासमोर उभे आहे.
शासनाकडे करण्यात आलेल्या महत्त्वाच्या मागण्या
मंदिराचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षिततेचा अहवाल जाहीर करावा. श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत तातडीने समावेश करावा. पुनर्बांधणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून आवश्यक निधी मंजूर करावा. गाभाऱ्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जतन, संवर्धन आणि पुनर्निर्माण करावे. मंदिर परिसरात कायमस्वरूपी अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, सीसीटीव्ही आणि सुरक्षा सुविधा उभाराव्यात. भाविकांसाठी मूलभूत सुविधा विकसित करून संपूर्ण तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र विशेष कृती आराखडा तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी.
‘पूर्वीपेक्षाही अधिक भव्य, सुरक्षित आणि सुविधायुक्त वाडी संस्थान उभारावे’
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभागृहात स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही केवळ आगीची घटना नसून महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला बसलेला मोठा धक्का आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून विशेष निधी मंजूर करावा आणि पुनर्बांधणीची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी. श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान पूर्वीपेक्षाही अधिक भव्य, सुरक्षित आणि आधुनिक स्वरूपात उभारण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशीही त्यांनी आग्रही मागणी केली.
जनतेतून लोकप्रतिनिधींच्या भूमिकेचे कौतुक
अधिकृत पदावर नसतानाही माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला, तर आमदार अनिल पाटील यांनी शासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभागृहात हा प्रश्न प्रभावीपणे मांडल्याने अमळनेरकर, वारकरी संप्रदाय आणि भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आता शासनाने तातडीने विशेष निधी मंजूर करून पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करावी आणि ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानचे ऐतिहासिक वैभव पूर्ववत करावे, अशी एकमुखी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





