Detection

अबब! लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडले ३ कोटींचे घबाड

१० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घराची तपासणी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेले अकोला येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील घरातून तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मालमत्तेची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू आढळून आल्या.

किरण चौधरी यांना २६ जून रोजी अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले होते. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासादरम्यान चौधरी यांचे राहते घर जळगावातील विष्णुनगर परिसरात असल्याचे समोर आल्यानंतर एसीबीच्या पथकाने घरझडतीची प्रक्रिया सुरू केली.

मात्र, घर बंद असल्याने पंचांसमक्ष ते सीलबंद करण्यात आले होते. दरम्यान, २८ जून रोजी पहाटेच्या सुमारास काही नातेवाईकांनी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर २ जुलै रोजी किरण चौधरी यांच्या पत्नी मनिषा चौधरी यांच्या उपस्थितीत पुन्हा घरझडती घेण्यात आली. यावेळी घरातून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीच्या विविध मालमत्तांची कागदपत्रे, ३१ हजार ४१६ रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या आणि ६ लाख २५ हजार ५४५ रुपये किमतीच्या विविध घरगुती वस्तू आढळून आल्या.

एकूण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे महसूल व मुद्रांक विभागात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button