Crime

जळगाव मनपाच्या रेकॉर्ड रूममधून फाईल गायब?; ..अखेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

२००६ मधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित कागदपत्र ; विधान मंडळात गाजला होता मुद्दा

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातील अत्यंत महत्त्वाची आणि न्यायालयीन कामकाजाशी संबंधित फाईल रेकॉर्ड रूममधून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महानगरपालिकेतील नगर रचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक (नगर रचनाकार) अमोल वसंतराव पाटील (वय ३२) यांनी शुक्रवारी ३ जुलै जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, अमोल पाटील हे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात कार्यरत असून बांधकाम परवानग्या, ले-आऊट (अभिन्यास) मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र तसेच भूसंपादनासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मनपात विभागातील विविध कामकाजाचे अभिलेख तयार करून ते रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया नियमितपणे केली जाते.

२००६ च्या घरकुल गैरव्यवहाराशी संबंधित फाईल
फिर्यादीनुसार, सन २००६ मध्ये मनपाच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३/२००६ दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पंचनाम्यानुसार महानगरपालिकेच्या एकूण १४ संचिका जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी गट क्रमांक ३३७/३ अ/१ आणि गट क्रमांक ३३७/३ अ/२ या गटांशी संबंधित फाईल नव्याने तयार करून त्या नगर रचना विभागाच्या रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. आवश्यकतेनुसार या फाईल्स संबंधित अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

वारंवार मागणी करूनही मिळाली नाही फाईल
३१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित फाईलची आवश्यकता भासू लागली. त्यानुसार रेकॉर्ड रूम इंचार्जकडे अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित फाईल रेकॉर्ड रूममध्ये उपलब्ध नसल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले. त्यानंतर तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी १५ मे २०२६ रोजी या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर नगर रचना विभाग, संबंधित रचना सहाय्यक तसेच अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण अभिलेख विभागात शोध घेतला. मात्र संबंधित फाईल कुठेही आढळून आली नाही.

अज्ञात व्यक्तीने फाईल चोरी केल्याचा संशय
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ३१ जानेवारी २०२४ ते २ जुलै २०२६ या कालावधीत रेकॉर्ड रूमच्या कायदेशीर ताब्यातून आणि विभाग प्रमुखांच्या संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने ही फाईल चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पोलीस तपासाकडे लक्ष
महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून न्यायालयीन कामकाजाशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब झाल्याचा हा प्रकार गंभीर मानला जात असून, या प्रकरणात जळगाव शहर पोलिसांकडून पुढील तपासानंतर नेमके वास्तव समोर येणार आहे. तसेच फाईल चोरीला गेली की निष्काळजीपणामुळे हरवली, याचा उलगडा तपासातून होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र तावडे हे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button