Crime

टाकरखेड्यात काळजाचा थरकाप! पती-पत्नीने दोन चिमुकल्यांसह रेल्वेखाली जीवन संपवले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण टाकरखेडा गावावर शोककळा पसरली असून, दोन मुलांसह संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्या दोन मुलांसह घरातून बाहेर पडत धावत्या रेल्वेखाली झोकून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत दुसरीत शिकणारा मुलगा सनी आणि अंगणवाडीत जाणारा चिमुकला राज हे दोघेही होते.

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पहाटे सुमारे ४.४० वाजता पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

दोन चिमुकल्यांसह कुटुंबाचा अंत; गाव सुन्न
या घटनेने टाकरखेडा गावाला मोठा धक्का बसला आहे. घरातून पहाटेच्या अंधारात बाहेर पडलेले हे कुटुंब पुन्हा कधीच परतले नाही, ही बाब समोर आल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चौघांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

पोलिसांकडून या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील चार जीवांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गाव अक्षरशः सुन्न झाले असून, या हृदयद्रावक घटनेने परिसरातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button