श्रावण पर्वानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा


श्रावण पर्वानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात
श्री सत्यनारायण महापूजा
नगरसेवक श्रीराम चौधरी होते सपत्नीक विशेष मानकरी; भाविकांनी घेतला दर्शनासह तीर्थप्रसादाचा लाभ
अमळनेर : श्रावण पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मंगळग्रह मंदिरात आज मंगळवार, दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष महापूजा विधिवत धार्मिक परंपरेनुसार झाली. या महापूजेचे विशेष मानकरी नगरसेवक श्रीराम चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुरेखाताई चौधरी या दाम्पत्याच्या शुभ हस्ते भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची विधिवत महापूजा तसेच सत्यनारायण कथाश्रवण व आरती आदी धार्मिक विधी झाले.
श्रावण महिना हा हिंदू धर्मपरंपरेत अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक साधनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. भगवान शंकरांच्या उपासनेसह या महिन्यात विविध धार्मिक अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा आणि श्री सत्यनारायण महापूजेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. सत्यनारायण भगवानांची पूजा ही सत्य, श्रद्धा, सदाचार आणि कुटुंबाच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करण्याची पवित्र परंपरा मानली जाते. भक्तिभावाने केलेल्या या पूजेमुळे मनाला शांती, सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वरचरणी समर्पणाची अनुभूती मिळते, अशी श्रद्धा आहे. मंदिराचे पुरोहित परशुराम शर्मा व अक्षय जोशी यांनी पौरोहित्य केले. त्यांना उमेश पाठक यांनी सहकार्य केले. या महापूजेच्या निमित्ताने मंदिर परिसरात सकाळपासूनच आध्यात्मिक व प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणामुळे मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला. महापूजेनंतर उपस्थित भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री मंगळग्रहाचे दर्शन घेतले तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. श्रावण पर्वानिमित्त मंदिरात दिवसभर भाविकांची वर्दळ राहिली. याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. बाविस्कर, सचिव सुरेश बाविस्कर यांच्यासह मंगल सेवेकरी, भाविक तसेच मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







