अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे रूम देणाऱ्या लॉजिंग मॅनेजरला अटक


अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे रूम देणाऱ्या लॉजिंग मॅनेजरला अटक
ओळखपत्र व रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याचा आरोप; रावेर पोलिसांची कारवाई
रावेर | प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीला कोणतीही नोंद किंवा ओळखपत्र न घेता लॉजिंगमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरला रावेर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सावदा रोडवरील वैशाली लॉजिंग येथे २३ वर्षीय नितीन सुभाष महाजन (रा. वाघोड, ता. रावेर) हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘फ्रेश होण्यासाठी’ लॉजिंगमध्ये घेऊन गेला होता. सणाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसांकडून शहरातील हॉटेल व लॉजची तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात वैशाली लॉजिंगचा मॅनेजर सुभाष चुडामण पाटील (वय ४३, रा. अजंदा, ता. रावेर) याने अल्पवयीन मुलीला कोणतेही ओळखपत्र न घेता तसेच लॉजिंगच्या रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असतानाही माहिती लपविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
POCSOसह विविध कलमांखाली गुन्हा
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(l), ३५१(२)(३) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ मधील कलम ४, १६ व २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोहेकॉ नितीन आमोदकर यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे पुढील तपास करीत आहेत.
लॉजिंग चालकांना पोलिसांचा इशारा
अल्पवयीन मुलांना किंवा मुलींना नियमांचे उल्लंघन करून रूम उपलब्ध करून देणाऱ्या लॉजिंग चालक व व्यवस्थापकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जळगाव पोलिसांनी दिला आहे. हॉटेल व लॉज चालकांनी ग्राहकांची ओळखपत्रे तपासून आवश्यक नोंदी ठेवाव्यात तसेच कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.







