कुंड्यापाणी-बढाई परिसरात अस्वलाची दहशत; शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला


कुंड्यापाणी-बढाई परिसरात अस्वलाची दहशत; शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला
प्रतिनिधी मन्सूर तडवी
चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी बढाई शिवारात अस्वलाच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांच्या अंतरात अस्वलाने दोन जणांवर हल्ला केल्याची घटना समोर आली असून, वनविभाग वेळेवर पोहोचला नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बढाई येथील रहिवासी नाना भारसिंग पावरा हे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी झाडीत लपून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना जवळच्या दवाखान्यात नेले, तेथून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, यापूर्वी दोन दिवस आधी याच भागात एका १८ वर्षीय तरुणावर देखील अस्वलाने हल्ला केला होता. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे शेतात जाण्यासाठी देखील शेतकरी घाबरत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती यावल वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. केवळ पिंजरा लावून वनविभागाने जबाबदारी झटकल्याचा आरोप होत आहे.
जखमी शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी, तसेच या परिसरात वनविभागाने गस्त वाढवून अस्वलाला तात्काळ जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी कुंड्यापाणी-बढाई परिसरातील नागरिकांकडून होत आहे







