“पाणी हा हक्क, भीक नव्हे!”; अमळनेरात २२ जूनला पाणीप्रश्नी भव्य मोर्चा

“पाणी हा हक्क, भीक नव्हे!”; अमळनेरात २२ जूनला पाणीप्रश्नी भव्य मोर्चा
अमळनेर, प्रतिनिधी : शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईविरोधात आणि कोलमडलेल्या नागरी सुविधांच्या प्रश्नांवर शहर विकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या २२ जून रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “पाणी हा नागरिकांचा हक्क आहे, भीक नव्हे,” अशी भूमिका घेत आघाडीने अमळनेरकरांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
शहर विकास आघाडीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिका निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांनी दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भरमसाठ पाणीपट्टी आकारूनही नियमित पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता जनतेच्या जगण्या-मरण्याचा विषय बनला असून सत्ताधाऱ्यांनी नागरिकांचा विश्वासघात केल्याचा आरोप आघाडीने केला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शहरातील नागरी सुविधांची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डेमय रस्ते, भूयारी गटारींच्या कामांमुळे झालेली दुरवस्था, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता आणि बंद पडलेले पथदिवे यामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही आवश्यक साफसफाई आणि नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ जून रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहर विकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी हांडे व मडके सोबत आणून आपल्या पाणी समस्येचा तीव्र निषेध नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“हा लढा केवळ पाण्यासाठी नाही, तर जगण्याच्या हक्कासाठी आणि अमळनेरच्या सन्मानासाठी आहे. आज आवाज उठवला नाही तर उद्या परिस्थिती आणखी बिकट होईल,” असे सांगत शहर विकास आघाडीने अमळनेरकरांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शहरातील वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






