
अमळगावच्या सुपुत्राचे वैद्यकीय क्षेत्रात यश; डॉ. मनीष पवार यांचे एमबीबीएस शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण
अमळगाव, ता. अमळनेर : अमळगाव येथील रहिवासी डॉ. मनीष महेश पवार यांनी रशियातील होस्टेस युनिव्हर्सिटी, रशिया येथून एमबीबीएस (मेडिसीन – जनरल फिजिशियन) पदवी विशेष प्राविण्य गुणांसह पूर्ण करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे अमळगावसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. मनीष पवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी रशियातील नामांकित विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस पदवी विशेष श्रेणीत संपादन केली.
डॉ. मनीष यांचे वडील महेश पवार हे नाशिक पोलीस दलात कार्यरत असून आई गृहिणी आहेत.
सामाजिक व लोकसेवेची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील ते सुपुत्र आहेत. ते माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास मोतीराम पवार यांचे नातू असून लोकसेवेचा वारसा पुढे नेत अमळनेर परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.
तसेच ते पीक संरक्षण सोसायटीचे व्हाइस चेअरमन दशरथ पवार यांचे पुतणे आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय त्यांनी व्यक्त केले असून त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. मनीष पवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अमळगाव व परिसरातील नागरिक, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.






