होमगार्डना न्याय मिळावा; आमदार बच्चू कडू यांना निवेदन सादर

होमगार्डना न्याय मिळावा; आमदार बच्चू कडू यांना निवेदन सादर
अमळनेर तालुक्यातील होमगार्ड जवानांची मागणी : समान कामासाठी समान वेतन व कायम नियुक्तीची मागणी
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील होमगार्ड सैनिकांच्या वतीने न्याय्य हक्क व सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी आज आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात होमगार्ड जवानांच्या सेवासंबंधी विविध प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सर्व होमगार्ड सैनिकांना वर्षभर म्हणजेच ३६५ दिवस काम मिळावे, तसेच “निष्काम सेवा हे ब्रीदवाक्य” याऐवजी प्रत्यक्ष सेवेत असलेल्या जवानांच्या हिताचे घोषवाक्य लागू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच होमगार्ड अधिनियम १९४७ मध्ये सुधारणा करून नवीन मसुदा तयार करावा व शासन निर्णय जारी करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच, तीन वर्षानंतर होणारी तात्पुरती नियुक्ती कायमस्वरूपी बंद करून, सलग पाच वर्ष सेवा बजावलेल्या होमगार्डना पोलीस शिपाई अथवा अमलदार पदासाठी थेट नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे सुविधा, सवलती आणि संपूर्ण विमा योजना होमगार्डना लागू कराव्यात, तसेच समान कामासाठी समान वेतन या तत्त्वानुसार वेतन द्यावे, अशीही मागणी निवेदनात नमूद आहे.
होमगार्डना राज्य कर्मचारी दर्जा देण्यात यावा, सेवा निवृत्ती झालेल्या जवानांना दरमहा १५ हजार रुपये पेन्शन मिळावी आणि सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षांपर्यंत वाढवावे, या मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
हे निवेदन आमदार बच्चू कडू यांना देण्यात आले असून त्याची प्रत गृहमंत्री, वित्त मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही देण्यात आली आहे






