रावेरसाठी राष्ट्रवादी काँगेसचा उमेदवार ठरला, उद्या होणार घोषणा

महा पोलीस न्यूज | ८ एप्रिल २०२४ | रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचा उमेदवार निश्चित नव्हता. अखेर उमेदवारावर पुण्यात शिक्कामोर्तब झाले असून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण पवार यांची लढत होणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खा.रक्षा खडसे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील, माजी आ.संतोष चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील, कंत्राटदार विनोद सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
सुरुवातीला माजी आ.संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा होती मात्र नंतर ऍड.रविंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. आज पुणे येथील मोदी बागेत दुपारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील, माजी आ.संतोष चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व सामाजिक, आर्थिक बाबी विचारात घेता श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या पक्षातर्फे यादी जाहीर केली जाणार असून त्यात नावाची घोषणा होणार आहे.