भव्य नवचंडी महायागाची मंगलमय पूर्णाहुती; भाविकांची मांदियाळी
श्री मंगळग्रह मंदिरात मंत्रोच्चार आणि महाआरतीने आदिशक्तींचा जागर; अमळनेरसह जळगाव, धुळ्यातील भाविकांची गर्दी

भव्य नवचंडी महायागाची मंगलमय पूर्णाहुती; भाविकांची मांदियाळी
श्री मंगळग्रह मंदिरात मंत्रोच्चार आणि महाआरतीने आदिशक्तींचा जागर; अमळनेरसह जळगाव, धुळ्यातील भाविकांची गर्दी
अमळनेर, प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात भव्य नवचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले. शक्ती, भक्ती आणि साधनेच्या चैतन्यमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याची सायंकाळी पाच वाजता मंत्रोच्चार आणि महाआरतीने मंगलमय सांगता झाली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन सत्रांत नवचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत धार्मिक विधी पार पडले. देवी आदिशक्तींच्या उपासनेसाठी दुर्गासप्तशतीचे पाठ, चंडीपाठ, विशेष मंत्रोच्चार आणि वैदिक यज्ञविधी करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर जयघोष आणि वेदघोषाने दुमदुमून गेला.
पहिल्या सत्रात गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, सर्वतोभद्र मंडल, नवग्रह मंडल आणि रुद्र स्थापना करण्यात आली. तसेच श्री भैरवी माता आणि नवदुर्गांचा अभिषेक व अर्चन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात अग्निस्थापना, नवग्रह हवन, सप्तशती पाठाद्वारे देवींचे हवन, बलिदान आणि पूर्णाहुती हे विधी पार पडले.
नवदुर्गांची कृपादृष्टी लाभावी, लक्ष्मीप्राप्ती व्हावी तसेच आयुरारोग्य उत्तम राहावे, या भावनेने अष्टमीचे हवन करण्यात आले. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि भूमीमाता या प्रमुख देवतांवर अभिषेक करण्यात आला. यज्ञात डाळिंब, ऊस, खीर आणि पांढऱ्या तिळांची आहुती अर्पण करण्यात आली.
विशेष यजमानांच्या हस्ते पूर्णाहुती आणि महाआरती
विशेष यजमानांनी मुख्य यज्ञवेदीवर मंत्रोच्चारात आहुती अर्पण केल्या. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, सौ. आशाताई महाले आणि मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांच्या साक्षीने सायंकाळी पाच वाजता यज्ञाची मुख्य पूर्णाहुती देण्यात आली.
त्यानंतर आदिशक्ती माता तसेच भगवान श्री कालभैरव आणि भैरवी मातेची सामूहिक महाआरती करण्यात आली. या सोहळ्याचे पौरोहित्य प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, यश जोशी, परशुराम शर्मा, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, तुषार दीक्षित, चंद्रकांत जोशी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, हेमंत गोसावी आणि अनिरुद्ध कुलकर्णी यांनी केले.
पाच देवींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. श्री मंगळग्रह देवांसोबतच श्री भूमीमाता, श्री पार्वती माता, श्री अनघालक्ष्मी माता, श्री भैरवी माता आणि श्री लक्ष्मी माता या पाच देवींच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी अमळनेर, धुळे, जळगावसह विविध भागांतील भाविकांनी गर्दी केली होती. नवचंडी महायागाच्या सांगतेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त आणि सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.
नऊ दिवस श्रीयंत्र आणि भौमयंत्रावर अर्चन
नवरात्रोत्सवाची घटस्थापना रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवार, दि. १२ ते रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भगवान श्री कालभैरव-भैरवी माता मंदिरासमोर दररोज सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत विशेष यजमानांच्या हस्ते श्रीयंत्र आणि भौमयंत्रावर अर्चन करण्यात आले. तसेच अमळनेर शहरातील महिला मंडळांच्या सदस्यांच्या शुभहस्ते नऊ दिवस दररोज सायंकाळी महाआरती करण्यात आली.
नवचंडी महायागाचे विशेष यजमान
गजेंद्र अंपळकर व सौ. कल्याणी गजेंद्र अंपळकर (उपमहापौर, धुळे), देवेंद्र अग्रवाल व सौ. (मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक पाटबंधारे विभाग, धुळे), डॉ. सयाजीराव भामरे व सौ. आश्विनी भामरे (अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, धुळे), अजय नाशिककर व सौ. (संचालक, नाशिककर ज्वेलर्स, धुळे), प्रदीपजी पानपाटील व सौ. (जिल्हा संयोजक, नाम फाऊंडेशन, धुळे), अरुण पवार व सौ. आरतीताई पवार (नगरसेविका, धुळे), डॉ. पराग उपकारे व सौ. (अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, धुळे), सुनील बैसाणे व सौ. (माजी सभापती, धुळे महापालिका), महेंद्रसिंग राजपूत व सौ. (संपादक, सायंदैनिक स्वराज्य खानदेश, धुळे), मनोज काळे व सौ. दीपमालाताई काळे (महापौर, जळगाव महापालिका), ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम, ॲड. केतन ढाके व सौ., भारद्वाज सपकाळे व डॉ. सौ. अमृताताई सोनवणे-सपकाळे, डॉ. जितेंद्र कोल्हे व सौ., ॲड. प्रमोद पाटील व सौ. संगीताताई पाटील, वासुदेव पाटील व सौ. (जिल्हाप्रमुख, शिवसेना), डॉ. जितेंद्र पाटील व सौ. (अमळनेर), किरण पुंजू वाणी व सौ. (उद्योजक, पारोळा) यांच्यासह अन्य मान्यवरांनी यजमान म्हणून सहभाग घेतला.
दर्शनासाठी आलेले विशेष मान्यवर
नवरात्रोत्सवानिमित्त धुळे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस व सौ., बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाच्या धुळे येथील अध्यक्षा अल्पाताई अनुप अग्रवाल, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र प्रकाश सोनवणे आणि धुळे महापालिकेच्या नगरसेविका वंदनाताई संजय भामरे यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले.







