निसर्गाचा अनोखा चमत्कार; एका केळीच्या झाडाला तब्बल २१४ कंबळ

निसर्गाचा अनोखा चमत्कार; एका केळीच्या झाडाला तब्बल २१४ कंबळ
भडगाव तालुक्यातील वाडे येथील दुर्मिळ घटना; अद्भुत नजारा पाहण्यासाठी शेतात नागरिकांची गर्दी
भडगाव (प्रतिनिधी) : निसर्गाची किमया किती अद्भुत असू शकते, याचा प्रत्यय भडगाव तालुक्यातील वाडे येथे आला आहे. येथील एका केळीच्या झाडाला तब्बल २१४ कंबळ लागल्याची दुर्मिळ घटना समोर आली असून या अनोख्या चमत्काराची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. हा अद्भुत नजारा पाहण्यासाठी नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने शेताला भेट देत आहेत.
वाडे येथील प्रगतीशील शेतकरी शांताराम भगवान गोठवाळ यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. मेहनत, योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करत त्यांनी केळीची बाग जोपासली आहे. सध्या बागेतील झाडे घडांनी बहरलेली असतानाच एका झाडाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सामान्यतः एका केळीच्या झाडाला एकच कंबळ येते. काही दुर्मिळ प्रसंगी दोन किंवा तीन कंबळ आढळतात. मात्र वाडे येथील या झाडाला तब्बल २१४ कंबळ लागल्याने शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. निसर्गाच्या या आगळ्यावेगळ्या किमयेची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.
विशेष म्हणजे, याच शेतातील आणखी एका केळीच्या झाडाला तब्बल २४ घडांसह फण्या लागलेल्या असून ते झाडही उत्तम प्रकारे वाढत आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ दुर्मिळच नव्हे तर अभ्यासाचा विषय ठरत आहे.
या अनोख्या केळीच्या झाडाची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर दररोज अनेक शेतकरी, नागरिक आणि निसर्गप्रेमी शेतात भेट देत आहेत. निसर्गाचा हा चमत्कार प्रत्यक्ष पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
याबाबत शेतकरी शांताराम गोठवाळ, नाना गोठवाळ आणि हेमराज परदेशी यांनी सांगितले की, “अशा प्रकारचे दृश्य आम्हीही प्रथमच पाहत आहोत. निसर्गाने दिलेली ही अनोखी देणगी असून अनेक जण हे झाड पाहण्यासाठी येत आहेत.”
निसर्गाच्या या अद्भुत किमयेने वाडे गावाची ओळख जिल्हाभरात निर्माण केली असून हा चमत्कार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.





