जवान राजेंद्र पाटील यांना अखेरचा सलाम !

जवान राजेंद्र पाटील यांना अखेरचा सलाम !
भडगाव तालुक्यात शोककळा : वलवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : हजारोंचा जनसागर लोटला
भडगाव (प्रतिनिधी)
भडगाव तालुक्यातील वलवाडी गावाचे सुपुत्र तथा सीमा सुरक्षा दल (बी. एस. एफ) मधील जवान राजेंद्र रामचंद्र पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याने संपूर्ण भडगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करत कर्तव्य बजावत असलेल्या या जवानाच्या अकाली निधनामुळे वलवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पार्थिवावर आज, दि. १० जुलै रोजी वलवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेंद्र पाटील यांनी सन २०१२ मध्ये सीमा सुरक्षा दलात बी. एस. एफ दलात प्रवेश करून देशसेवेची वाट निवडली होती. आपल्या प्रामाणिक, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे त्यांनी सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या त्यांची नियुक्ती छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे होती. कर्तव्य बजावत असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी प्रथम मूळ गावी आणण्यात आले. पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सुरत येथील विशेष रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार असून, त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाआहे. वलवाडी गावातील नागरिकांनी अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळावू व देशभक्त जवान गमावल्याची भावना व्यक्त केली. आज दुपारी वलवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोकसलामी अर्पण करून आपल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप दिला. उपस्थितांनी “भारत माता की जय” आणि “राजेंद्र पाटील अमर रहें” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अंत्यसंस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांच्या निधनामुळे भडगाव तालुक्याने देशसेवेसाठी समर्पित असलेला एक कर्तव्यनिष्ठ जवान गमावला आहे. त्यांच्या देशप्रेमाची, शौर्याची आणि सेवाभावाची आठवण कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या स्मृतींना संपूर्ण तालुक्यातून मातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, शोकाकुल पाटील कुटुंबीयांप्रती सर्व स्तरातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.





