‘विकसित भारत @2047’च्या दिशेने युवकांना प्रेरणा; विद्यापीठस्तरीय ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर’ उत्साहात सुरू
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम; सात दिवसांच्या शिबिरात ३०० स्वयंसेवकांचा सहभाग

‘विकसित भारत @2047’च्या दिशेने युवकांना प्रेरणा; विद्यापीठस्तरीय ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर’ उत्साहात सुरू
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम; सात दिवसांच्या शिबिरात ३०० स्वयंसेवकांचा सहभाग
जळगाव, : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित विद्यापीठस्तरीय ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ चे उद्घाटन प्र. कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. दिनांक 10 जुलै ते 16 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराची संकल्पना ‘विकसित भारत @ 2047’ या राष्ट्रीय ध्येयावर आधारित असून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील 300 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे म्हणाले की, भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न केवळ शासनाच्या योजनांमुळे पूर्ण होणार नाही. त्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची जाणीव आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, नेतृत्वगुण, शिस्त, सेवाभाव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी आपल्या भाषणात विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे युवा शक्ती असून ज्ञान, कौशल्य, नवकल्पना, चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर भारत जागतिक स्तरावर अग्रस्थान प्राप्त करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विकसित भारताची संकल्पना ही केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि नैतिक प्रगतीलाही समान महत्त्व देणारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. योगेश पाटील यांनीही स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. पवित्रा पाटील, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन-काळे, अमोल मराठे, डॉ. चंद्रशेखर वाणी एन.एस.एस चे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. राजू गवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. प्रवीण महाले यांनी केले. सूत्रसंचालन धुळे जिल्हा समन्वयक डॉ. निलेश पाटील यांनी, तर आभारप्रदर्शन नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. विशाल करपे यांनी केले.
सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात नेतृत्व विकास, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांवर विविध तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली असून स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रसेवेची भावना दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.






