
दिल्लीतील आंदोलनातील कथित लाठीचार्ज व संविधानाच्या अवमानप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी; भडगावमध्ये निषेध व्यक्त
भडगाव | प्रतिनिधी
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे CJP च्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्ज, गैरवर्तन तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीचा कथित अवमान झाल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीतर्फे भडगावच्या तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन देण्यात आले.
लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततामय व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. अशा आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर बळाचा अवाजवी वापर, गैरवर्तन व लाठीचार्ज झाल्याच्या समोर आलेल्या माहितीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी
आंदोलनादरम्यान भारतीय संविधानाच्या प्रतीचा कथित अवमान झाल्याची तसेच संविधानाची प्रत फाडण्यात किंवा तोडण्यात आल्याची माहिती समोर आल्याचा उल्लेख करत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गोकुळ संसारे, ॲड. आर. बी. ब्राह्मणे, ॲड. मोहसीन खान, रवि सोनवणे, मच्छिंद्र मोरे, अमरदीप संसारे, सतीश मोरे, शंकर खैरे, पिंटू भिल्ल, उत्तम सूर्यवंशी, शेखर पाटील आदी उपस्थित होते.






