भोकर बँक दरोडा प्रकरणी स्वतंत्र पोलीस चौकी उभारा!
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

भोकर बँक दरोडा प्रकरणी स्वतंत्र पोलीस चौकी उभारा!
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेवर पडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच गावात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भोकर येथील एसबीआय शाखेत घडलेली ३६ कोटी रुपयांच्या दरोड्याची घटना गंभीर असून, या प्रकरणामुळे बँका आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बँकांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक संस्थांच्या सुरक्षेसाठी नियमित गस्त, गुप्त माहिती संकलन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कामकाजाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे
दरोड्याच्या घटनेत भोकर येथील जागरूक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत धाडस दाखवून संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांचे हे धाडस कौतुकास्पद असले, तरी कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नागरिकांवर पडू नये. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे.
भोकर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, आर्थिक व्यवहार आणि सुरक्षेची गरज लक्षात घेता गावात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यापासूनचे अंतर आणि अपुऱ्या गस्तीमुळे गुन्हेगारांवर प्रभावी वचक निर्माण होत नसल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. स्वतंत्र पोलीस चौकीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
एसबीआय दरोडा प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या कथित दुर्लक्षाची आणि कार्यपद्धतीची सखोल विभागीय चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच भोकर येथे स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी केली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, अर्जुन सोनवणे, सुरेश पवार, किरण बारोड, लोटन सोनवणे आणि प्रभाकर कोळी उपस्थित होते.






