Politics

दुष्काळाचे आव्हान स्वीकारून गावागावांत रचनात्मक काम उभारा

दुष्काळाचे आव्हान स्वीकारून गावागावांत रचनात्मक काम उभारा

स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ता अभ्यास वर्ग; रवींद्र भुसारी यांचे आवाहन, राजेंद्र नन्नवरे यांनी वेधले जलसंकटाकडे लक्ष

फैजपूर, प्रतिनिधी : माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व. हरिभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथील शुभ दिव्य लॉन येथे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले. सध्याची दुष्काळी परिस्थिती, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन तसेच लोकसहभागातून गावपातळीवर रचनात्मक उपक्रम उभारण्याच्या विषयावर यावेळी विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप महाराष्ट्र प्रदेशचे माजी संघटनमंत्री रवींद्र भुसारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे आणि फैजपूर शहराध्यक्ष चंद्रकांत जाधव उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल पाटील आणि सुरेश धनके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन के. जी. पाटील यांनी केले.

कार्यकर्त्यांची भूमिका आणि स्व. हरिभाऊ जावळे यांच्या कार्याचा वारसा यावर मार्गदर्शन करताना रवींद्र भुसारी यांनी कार्यकर्ता हा पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीतील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. स्व. हरिभाऊ जावळे यांची मूळ ओळख कार्यकर्ता म्हणून होती. आमदार, खासदार आणि विविध राजकीय पदांवर काम करतानाही त्यांनी स्वयंसेवकाचा स्वभाव कायम जपला, असे भुसारी यांनी नमूद केले.

शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांना केंद्रस्थानी ठेवून स्व. हरिभाऊ जावळे यांनी विविध प्रकल्प व योजना राबविल्या. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची दिशा आमदार अमोल जावळे यांच्या कार्यातून पुढे जात असल्याचे भुसारी यांनी सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राजेंद्र नन्नवरे यांनी रावेर-यावल परिसरातील जलसंकटाच्या स्थितीवर प्रकाश टाकला. भूजलाचा वाढता उपसा, अपुरे भूजल पुनर्भरण आणि पावसातील अनिश्चितता यामुळे जलव्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत केवळ शासनाच्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

नन्नवरे यांनी नागपूर जिल्ह्यातील अरोली-मौदा येथील सामूहिक शेतीचा प्रयोग, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, बारीपाडाचे चैत्राम पवार, राहीबाई पोपरे यांची बीजबँक तसेच मियावाकी घनवन प्रकल्प यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या प्रयोगांपासून प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात दुष्काळ, जलसंधारण, पर्यावरण आणि शेतीशी संबंधित रचनात्मक उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळावर मात करण्यासाठी जनजागृती, लोकसहभाग आणि प्रत्यक्ष कृती या तीन बाबींना केंद्रस्थानी ठेवून गावपातळीवर काम उभे करण्याची दिशा या अभ्यास वर्गातून देण्यात आली.

यावेळी माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, आमदार अमोल जावळे, विधानपरिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्यासह रावेर-यावल तालुक्यातील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button