चौगाव किल्ल्याकडे जाणारा रस्ता खड्डेमय

चौगाव किल्ल्याकडे जाणारा रस्ता खड्डेमय
पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची पर्यटकांची मागणी; ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाकडेही दुर्लक्ष
चौगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेला चौगाव किल्ला हा जळगाव जिल्ह्यातील एकमेव सुस्थितीत असलेला डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चौगाव ते किल्ला हा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक व ग्रामस्थांकडून होत आहे.

बाराव्या शतकातील अहिर राज्यांच्या काळात भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल २७ एकर क्षेत्रात या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्यावर शालिवाहनकालीन लेण्या, एकाच दगडात कोरलेला सप्ततलाव समूह, दहा गुंठे क्षेत्रातील गवळी वाडा, भव्य तटबंदी, दोन प्रवेशद्वारे, हेमाडपंथी मंदिराचे अवशेष, राणीकाजल माता समाधी तसेच अन्य समाधीस्थळे पाहायला मिळतात. याशिवाय जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा, त्रिवेणी महादेव मंदिर आणि तीन नाल्यांचा संगम यामुळे हा परिसर ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
दरवर्षी जून महिन्यापासून येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण होत असून पर्यटकांची गैरसोय वाढली आहे. किल्ला परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक आसने, स्वच्छतागृहे, पर्यटकांसाठी निवास सुविधा, किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या, रेलिंग व प्रकाशयोजना यांचा अभाव असल्याने पर्यटन विकास रखडल्याचे चित्र आहे.
तसेच तटबंदी, प्रवेशद्वार, गवळी वाडा आणि मंदिर अवशेषांचे संवर्धन तातडीने होणे आवश्यक असल्याची मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे. घनदाट जंगल, जैवविविधता, वन्यप्राणी, पक्षी आणि औषधी वनस्पतींनी समृद्ध असलेल्या या परिसराचे संरक्षण करण्याचीही गरज व्यक्त होत आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे चौगाव किल्ल्यावर अवैध अतिक्रमण, अवशेषांची नासधूस आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





