दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम; ग्रामस्थांच्या समस्या ऐकून जागेवरच दिले निर्णय

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम; ग्रामस्थांच्या समस्या ऐकून जागेवरच दिले निर्णय
जामन्या रेशन दुकान निलंबनाच्या सूचना; आरोग्य, रस्ते, रोजगार व मोबाईल नेटवर्कचा घेतला प्रत्यक्ष आढावा
जळगाव | प्रतिनिधी
दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी यावल तालुक्यातील लंगडाआंबा, जामन्या, गाड्या आणि उसमळी या दुर्गम गावांमध्ये दोन दिवस मुक्काम करून जनतेशी थेट संवाद साधला. ४ आणि ५ जून रोजी झालेल्या या विशेष दौऱ्यात त्यांनी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत अनेक प्रश्नांवर जागेवरच निर्णय घेतले.
जनसंवादातून मांडल्या विविध समस्या
जामन्या येथील वन विभागाच्या प्रांगणात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात शंभरहून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. रेशन धान्य वितरणातील अडचणी, आरोग्य सेवा, रस्त्यांची दुरवस्था, रोजगार हमी योजना, घरकूल, सौरऊर्जा, वनहक्क आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या.
रेशन दुकान निलंबित करण्याचे आदेश
धान्य वितरणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जामन्या येथील स्वस्त धान्य दुकानाची प्रत्यक्ष पाहणी केली. धान्याची गुणवत्ता आणि वितरण व्यवस्थेची तपासणी केल्यानंतर संबंधित दुकान तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या.
आरोग्य सेवांबाबत कठोर भूमिका
जामन्या येथील आरोग्य उपकेंद्र अनेकदा बंद राहत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यानंतर उपकेंद्राला भेट देत जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात वास्तव्यास राहून २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिले. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
रखडलेल्या रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश
मोहमांडली-माथन-गाड्या मार्गासह हरिपुरा-आंबापाणी-उसमळी-लंगडाआंबा आणि वाघझिरा-लंगडाआंबा या महत्त्वाच्या रस्त्यांची कामे रखडल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. यावर संबंधित विभागांना कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात या भागासाठी मिनी बस सेवा सुरू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.
मोबाईल नेटवर्कची केली प्रत्यक्ष चाचणी
दुर्गम भागातील दूरसंचार सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लंगडाआंबा, उसमळी आणि गाड्या-जामन्या येथील बीएसएनएल टॉवरची पाहणी केली. त्यांनी स्वतः मोबाईलवरून कॉल करून नेटवर्कची गुणवत्ता तपासली आणि सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.
रोजगार, वनहक्क आणि उद्योग विकासावर भर
समुदाय वनहक्कांतर्गत मंजूर विकासकामांचा आढावा घेत रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण कामे प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच डिंक, चारोळी आणि बांबू आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व अभ्यास दौरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले.
घरकूल व सौर योजनांतील त्रुटींवर लक्ष
घरकूल योजनेंतर्गत मंजूर घरांपैकी अत्यल्प घरे पूर्ण झाल्याचे आढळून आल्यानंतर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले. कुसुम सौर योजनेतील लाभार्थ्यांना अपूर्ण साहित्य मिळाल्याच्या तक्रारीची दखल घेत उर्वरित साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागाला देण्यात आल्या.
पर्यावरण दिनी वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लंगडाआंबा येथे सिताफळाच्या रोपाचे वृक्षारोपण केले. तसेच जामन्या येथील आश्रमशाळा आणि जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक सुविधांचाही आढावा घेतला.
प्रशासनाची लोकाभिमुख कार्यशैली अधोरेखित
ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांवर केवळ बैठकीत चर्चा न करता प्रत्यक्ष स्थळभेटी, तपासण्या आणि तातडीच्या सूचना देण्यात आल्याने प्रशासनाची लोकाभिमुख व संवेदनशील कार्यपद्धती पुन्हा अधोरेखित झाली. या दौऱ्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास आणि समाधानाची भावना निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.





