OtherCrimeDetection

घरातील रंगकाम करताना सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास; रंगकाम करणारा अटकेत

घरातील रंगकाम करताना सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास; रंगकाम करणारा अटकेत

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; ३२.५ ग्रॅम सोने आणि २० हजारांची रोकड हस्तगत

जळगाव : घरात रंगकाम करण्यासाठी आलेल्या कामगाराने बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गोकुळ सुरेश बागडे (वय ३६, रा. कंजरवाडा, जळगाव) याला अटक केली असून, त्याच्याकडून ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शिवशंकर नवीन जोशी कॉलनी, जळगाव येथील विवेक पांडुरंग जोशी (वय ४३, व्यवसाय नोकरी, महावितरण) यांच्या घरी २४ नोव्हेंबर रोजी रंगकाम सुरू होते. सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान रंगकाम करणाऱ्या गोकुळ बागडे याने घरातील बेडरूममधील कपाटातून ३२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने घटनास्थळी पाहणी करून माहिती संकलित केली. गोपनीय माहितीच्या आधारे गोकुळ बागडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हस्तगत केलेल्या मुद्देमालात २ लाख ७० हजार रुपये किमतीची २७ ग्रॅम वजनाची सोन्याची शॉट पोत, ५० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ हजार रुपये किमतीची ०.५ ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी आणि २० हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. एकूण ३२.५ ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असा ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, गिरीष पाटील, प्रमोद लाडवंजारी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, राहुल घेटे आणि सुभाष साबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button