शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मणक्यांच्या अवघड शस्त्रक्रिया विनामूल्य होणार
‘द स्पाईन फाउंडेशन, मुंबई’ आणि अस्थिव्यंगोपचार विभागाचा संयुक्त उपक्रम; आतापर्यंत २५० रुग्णांची नोंदणी, ४० रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मणक्यांच्या अवघड शस्त्रक्रिया विनामूल्य होणार
‘द स्पाईन फाउंडेशन, मुंबई’ आणि अस्थिव्यंगोपचार विभागाचा संयुक्त उपक्रम; आतापर्यंत २५० रुग्णांची नोंदणी, ४० रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज
जळगाव (प्रतिनिधी) : मणक्यांच्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक उपक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभाग आणि मुंबई येथील ‘द स्पाईन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्यांच्या आजारांचे निदान व उपचारासाठी आठवे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांतर्गत आवश्यक असलेल्या रुग्णांवर अत्यंत अवघड आणि अतिजोखमीच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई येथील ‘द स्पाईन फाउंडेशन’चे तज्ज्ञ डॉक्टर ११ डिसेंबर रोजी जळगावात येणार आहेत.
शिबिराच्या पूर्वतयारीसाठी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) कक्ष क्रमांक ११५ येथे मणक्यांच्या आजारांची नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे. रुग्णांसाठी आवश्यक एक्स-रे तसेच अद्ययावत ‘थ्री-डी टेस्ला एमआरआय’ तपासणीची सुविधाही रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्वतपासणी सुरू असून, जिल्ह्यातील रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत २५० रुग्णांची नोंदणी; ४० जणांना शस्त्रक्रियेची गरज
या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २५० रुग्णांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी सुमारे ४० रुग्णांना आधुनिक पद्धतीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते, असे निदान करण्यात आले आहे. सविस्तर तपासणीनंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असेल, त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच वाढत्या वयानुसार पाठदुखी आणि मणक्यांचे विकार वाढत आहेत. या शिबिरात मणक्यांचा वेडेवाकडेपणा, मणक्यांवर आलेला दाब, सायटिका, पाठदुखी, हाडांचे विविध आजार, पायाची ताकद अचानक कमी होणे, पायाला मुंग्या येणे तसेच मणक्यांचे दुर्मिळ आणि गुंतागुंतीचे आजार असलेल्या रुग्णांची सखोल तपासणी केली जात आहे.
रुग्णांनी पूर्वतपासणीसाठी ओपीडीत यावे
“नसा किंवा पाठीच्या दुखण्यावर प्रत्येक वेळी शस्त्रक्रियेची गरज असतेच असे नाही. योग्य निदान आणि उपचारांमुळे हे आजार बरे होऊ शकतात,” असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
मणक्यांचे विकार आणि हाडांच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ओपीडी कक्ष क्रमांक ११५ येथे उपस्थित राहून पूर्वतपासणी करून घ्यावी, असे आवाहन अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी केले आहे.






