ब्रेकिंग : कार्यालयाबाहेरच वरिष्ठ पत्रकारावर प्राणघातक हल्ला, बियरची बाटली फोडली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील बळीराम पेठेत असलेल्या दैनिक लोकशाही कार्यालयाच्या बाहेर वरिष्ठ पत्रकार दीपक कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवार दि.२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. कुलकर्णी यांच्या मानेवर बियरची बाटली फोडण्यात आली असून त्यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेले दीपक चिंतामण कुलकर्णी वय-४१ हे गेल्या २३ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते दैनिक लोकशाहीत संपादकीय विभागात कार्यरत असून ते दररोज घरून गावाहून ये-जा करतात. रविवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ते बळीराम पेठेत एका सामाजिक कार्यकर्त्याशी चर्चा करत उभे होते.
पोटात बाटली घुसवण्याचा प्रयत्न
चर्चा करून पायी कार्यालयाकडे परत जात असताना कार्यालयाच्या अलीकडेच दुचाकीवर मागून आलेल्या दोघांनी त्यांच्या मानेवर बियरची बाटली फोडली. अचानक झालेल्या हल्ल्यातून त्यांनी स्वतःला सावरले आणि मागे फिरले. एक हल्लेखोर पोटात बाटली घुसवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी हातात बाटली पकडल्याने ते बचावले मात्र हाताला दुखापत झाली. जवळच असलेल्या एका तरुणाने आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी पळ काढला आणि दगड मारून फेकला.
शहर पोलीस ठाण्यात नोंद
दीपक कुलकर्णी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तीन हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






